मुंबई, राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा शुभारंभ झाला हि स्पर्धा १९ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. वरळीच्या जांभोरी मैदानावर आयोजित या कार्यक्रमास कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री व मुंबई उपनगर पालक मंत्री मा. ना. मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री व मुंबई शहर पालक मंत्री मा. ना. दीपक केसरकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. या स्पर्धेसाठी आवश्यक त्या सर्व बाबी उपलब्ध करुन देण्यात येणार असून स्पर्धेसाठी लागणाऱ्या सर्व खर्चाची तरतूदही राज्य सरकारमार्फत करण्यात येईल. या स्पर्धांमधून खेळलेल्या उत्कृष्ट खेळाडूंना बक्षीस देण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. तसेच राज्यपाल रमेश बैस यांनी सुध्दा अश्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ होणे हि एक आगळी वेगळी घटना असल्याचे सांगितले. यामुळे भ्रमणध्वनी व दुरचित्रवाणी मध्ये अडकलेले विद्यार्थी व खेळाडू मैदानावर यावेत हीच यामागची भावना असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. या स्पर्धा अंधेरी, बोरीवली, कुर्ला, मुलुंड, मुंबई शहर १ व मुंबई शहर २ अश्या सहा विभागात खेळवल्या जातील.
उद्घाटनावेळी जांभोरी मैदानात लेझीम स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मुंबई शहर २ (द. मुंबई) विभागातील ११ संघ सहभागी झाले होते. या सर्व संघामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केलेल्या पहिल्या तीन संघांना पारितोषिकासाठी निवडले जाते. १७ वर्षाखालील संघामध्ये प्रथम क्रमांक मराठा मंदिर बाबासाहेब गावडे इंग्लिश माध्यमिक विद्यालय, वरळीने, द्वितीय क्रमांक एस. व्ही. एस. हायस्कूल, वरळीने तर तृतीय क्रमांक सॅक्रेड हायस्कूल वरळीने पटकावला. तर खुल्या गटात एस.एन. डी.टी. हायस्कूल विजेते ठरले. याच बरोबर किल्ले प्रदर्शन स्पर्धा सुध्दा याच मैदानावर सुरु असून ती रविवार पर्यंत चालणार असून त्यानंतर त्या स्पर्धेतील विजेते जाहीर केले जातील.
दुसऱ्या दिवशी मुलुंड येथे झालेल्या मुली व मुलांच्या लेझीम स्पर्धेत विक्रोळी पार्क साईट मराठी शाळाने प्रथम क्रमांक तर रमाबाई सहकार नगर मराठी शाळेने द्वितीय क्रमांक मिळवला. तर खुल्या गटात एच. के. गिडवानी ज्यु. महाविद्यालय विजयी ठरले. या स्पर्धांमधून प्रत्येक विभागातून (एकूण सहा विभाग) प्रथम आलेले संघ अंतिम फेरीत पुन्हा प्रदर्शन करताना दिसतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा