डोंबिवली दि.२७ : मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासनाने अध्यादेश जारी केल्यानंतर शनिवारी डोंबिवलीत सकल मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शनिवारी संध्याकाळी डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. "छत्रपती शिवाजी महाराज की जय !" अशा घोषणा देत महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर सकल मराठा समाजामध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शनिवारी संध्याकाळी डोंबिवलीतही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करत सकल मराठा समाजाच्या बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करत, गुलाल उधळत पेढे वाटून आनंद साजरा केला. आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला म्हणून त्यांचे तसेच कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यात आले. डीजे च्या तालावर थिरकत व घोषणाबाजी करत मिठाईचे वाटप करून, मराठा बांधवांनी परिसर दणाणून सोडला.
या प्रसंगी डोंबिवलीतील सकल मराठा समाजाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मनोज जरांगे-पाटील व आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा