विशेष प्रतिनिधी
सतीश वाघ फाउंडेशन प्रायोजित आणि निर्धार-एक हात आपुलकीचा आयोजित निनाद सांस्कृतिक महोत्सव दि.१२, १३ आणि १४ जानेवारी २०२४ रोजी जोगेश्वरी पूर्व येथील अरविंद गंडभीर हायस्कूलच्या पटांगणात पार पडला. जोगेश्वरीतील सांस्कृतिक चळवळ पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. या निनाद महोत्सवाला जोगेश्वरी तसेच आसपासच्या रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दि.१२ जानेवारीला सतीश वाघ फाउंडेशन आणि सुप्रिया लाइफ सायन्सेस लिमिटेडचे सर्वेसर्वा आणि अरविंद गंडभीर शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. सतीश वाघ यांच्या हस्ते झाले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सतीश वाघ फाउंडेशनच्या आणि निर्धार-एक हात आपुलकीचा या संस्थांच्या सामाजिक कार्यांची माहिती देणारी चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर प्रख्यात संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांच्या संचाकडून "गाणी मनातली" मराठी सुमधुर गाण्यांची बहारदार मैफल सजवण्यात आली. यात सुप्रसिद्ध गायक ह्रिषिकेश रानडे, चैतन्य कुलकर्णी तसेच गायिका मधुरा कुंभार, केतकी भावे-जोशी यांनी अनेक जुनी-नवी गाणी सादर केली. मयुरेश साने या हरहुन्नरी कलाकाराने या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची भूमिका उत्तमरीत्या पार पाडली. तसेच, निलेश परब ढोलकीवर, आर्चीस लेले तबल्यावर आणि विजू तांबे यांनी बासरीवर नेहमीप्रमाणे आपली जादू दाखवली. जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांनी या संगीत मैफिलीचा मनमुराद आस्वाद घेतला.
निनाद सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दि.१३ जानेवारी रोजी सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या "आमने-सामने" या मराठी नाटकाचा प्रयोग झाला. या नाटकातील प्रमुख भूमिका करणारे कलाकार लीना भागवत, मंगेश कदम आणि इतर कलाकारांनी एक वेगळाच आणि सध्याच्या तरुण पिढीला साद घालणारा विषय प्रेक्षकांसमोर आपल्या नाटकातून मांडला आणि प्रेक्षकांची मने जिंकली.
निनाद महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच रविवार दि.१४ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि कलाकार संतोष पवार लिखित आणि दिग्दर्शित एक हास्यप्रधान व्यावसायिक मराठी नाटक "यदा कदाचित रिटर्न्स" चा प्रयोग आयोजित करण्यात आला. या तुफान विनोदी आणि संगीतमय नाटकाने तर प्रेक्षकांमध्ये धम्माल उडवून दिली. पूर्ण प्रयोगादरम्यान प्रेक्षकांमध्ये तुफान हशा पिकत होता.
निनाद सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी सतीश वाघ फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. सतीश वाघ यांना निर्धार तर्फे शुभेच्छापत्र देऊन मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
अशा तऱ्हेने सतीश वाघ फाउंडेशन आणि निर्धार- एक हात आपुलकीचा आयोजित निनाद सांस्कृतिक महोत्सव रसिक प्रेक्षकांच्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला गेला. या महोत्सवासाठी सतीश वाघ फाउंडेशनतर्फे सढळ हस्ते मदत करण्यात आली तसेच अरविंद गंडभीर हायस्कूलच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या शाळेचे पटांगण उपलब्ध करून देऊन निर्धारला मोलाची मदत केली. प्रेक्षकांनीही असा सांस्कृतिक महोत्सव जोगेश्वरी येथे दरवर्षी आयोजित केला जावा अशी विनंती निर्धारच्या सदस्यांकडे केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा