BREAKING NEWS
latest

'जान्हवीज मल्टी फाउंडेशन'च्या 'वंदे मातरम् महाविद्यालय' व 'जन गण मन' शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.१२ : 'समाज सेवा हीच ईश्वर सेवा' ह्याच हेतूने आज दिनांक १२ फेब्रुवारी रोजी 'जे एम एफ' शिक्षण संस्थेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे 'शासन आपल्या दारी' च्या माध्यमातून राबविण्यात येणारे इतरही स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आले होते. 'शासन आपल्या दारी' ह्या उपक्रमाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री रोजगार हमी  निर्मिती, आयुष्यमान भारत कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना, आधारकार्ड सेवा, रेशनकार्ड, त्याच बरोबर मोफत रक्त तपासणी, मधुमेह, रक्तदाब तपासणी, यासारखे अनेक विविध महत्वाचे स्तुत्य उपक्रम राबविले गेले.
शिबिराचे उद्घाटन डोंबिवलीच्या नगरसेविका तथा माजी महापौर विनिता राणे, 'जे एम एफ' संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे तसेच सचिव डॉ. सौ.प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते झाले. समाजाचा विकास आणि आरोग्या विषयी त्यांचे हित कशात आहे हे शाळेतील विध्यार्थ्यांना समजावून आपणही गरजूंना मदत करावी ही भावना कायमच आपल्याला सुख देत असते, अशा परिस्थितीत गरजूंना व सर्वसाधारण वर्गाला देखील ह्या उपक्रमाचा फायदा व्हावा ह्याच हेतूने आजचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगून संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्व उपस्थितांना शिबिराचा लाभ घ्यावा असे मोलाचे आवाहन व मार्गदर्शन केले.

प्रभागातील माजी नगरसेविका तथा कल्याण-डोंबवली महानगरपालिकेच्या माजी महापौर विनिता राणे यांनी सामाजिक आणि जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनी ह्या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे सांगितले. आजच्या शिबिरात अनेक मोठे मान्यवर, तसेच मोठ्या डॉक्टरांचे पथक दाखल झाले होते. सामाजिक जबाबदाऱ्या, व एक जागरूक नागरिक म्हणून सतर्क राहणे आवश्यक आहे असे माननीय सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी  शासनाला सहकार्य करा असे सांगितले.
दिव्यांग कल्याणकारी योजना व साहित्य वाटप, उत्पन्न दाखला, प्रधानमंत्री स्वनिधी व मातृत्व योजना, के वाय सी माहिती, ज्येष्ठ नागरिक दाखला अशा प्रकारचे सर्व आवश्यक आणि गरजेचे उपक्रम शिबिरात दाखल केले होते. सकाळी दहा वाजल्यापासून सुरू करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबीर सायंकाळी पाच पर्यंत चालू होते. मोठ्या प्रमाणात साधारणतः पाचशेच्या वर नागरिकांच्या संख्येने तसेच सर्व 'जन गण मन' शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिबिराचा लाभ घेतला. आरोग्य शिबिरातील सर्व सहभागी पथकांना पेन भेटवस्तू देऊन कोल्हे दांपत्याने त्यांचे स्वागत केले. यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकरचे 'ह' प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत, जयराम शिंदे, विजय भोईर, सुशील सुतार तसेच महापालिकेचे  इतर अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत