BREAKING NEWS
latest

जे एम एफ शिक्षण संस्थेचा मानाचा "जे एम एफ राष्ट्रज्योत पुरस्कार" प्रदान सोहळा उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : 'जान्हवीज मल्टी फाउंडेशन' दर पाच वर्षांनी समाजासाठी उदात्त कार्य करणाऱ्या नामवंत व्यक्तींना " राष्ट्रज्योत " पुरस्कार प्रदान करते.२०१० पासून अनेक दिग्गज व्यक्तींना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्या दिग्गज व्यक्ती म्हणजे, पद्मश्री उज्वल निकम, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उषा गांधी (महात्मा गांधींची नात), बी. के मृत्युंजय, पद्मश्री डॉ.विकास महात्मे, बी.के गोदावरी, बी.के नलिनी, डॉ. दीपक हरके, प्राचार्य डॉ.कुऱ्हाडे, आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व केनेथ जस्टर (अमेरिकेचे भारतातील राजदूत) इत्यादी. समाजसेवा हीच देशसेवा आहे. म्हणूनच स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकरांनी सांगितले आहे की, देहाकडून देवाकडे जाताना जो मधला मार्ग लागतो, तो म्हणजे आपला भारत देश. आपणही आपल्या देशाचे देणे लागतो, ह्याच हेतूने सतत देश सेवेसाठी कार्यरत असणे गरजेचे आहे. कोणतीही निस्वार्थी भावना आणि देशासाठी केलेली सेवा ही आपल्या मातृभूमी साठी केलेला त्याग आहे.
'जे एम एफ' संस्थेचे अहोभाग्य च म्हणावे लागेल की ह्यावर्षीचा 'जे एम एफ राष्ट्र ज्योत पुरस्कार २०२४' हा मानाचा पुरस्कार कारगिल योध्दा तसेच परमवीर चक्र सन्मानित कॅप्टन (मानद) योगेंद्रसिंह यादव ह्यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रम सोहळ्याची सुरुवात कॅप्टन योगेंद्र सिंह यादव व अन्य मान्यवर यांचे शाळेच्या प्रवेशद्वार मधून विद्यार्थ्यांच्या लेझिम,ढोल ताशे तसेच पोलीस बँड ने वाजतगाजत जंगी स्वागत करण्यात आले. भारत मातेच्या सुपुत्राचे भारतीय संस्कृतीनुसार पाच सौभाग्यवती व संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी त्यांचे औक्षण केले. जे एम एफ च्या प्रांगणात कॅप्टन योंगेंद्र सिह यादव ह्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य करून कॅप्टन यादव यांना कृतकृत्य केले. त्यांच्या हातात मुलांनी झेंडा देऊन फडकवला गेला, त्याच वेळी सर्वांनी कृतज्ञतापूर्वक झेंड्या ला वंदन करत सलामी दिली. कॅप्टन योगेंद्र सिंह यादव व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तद नंतर संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. राजकुमार कोल्हे यांनी स्वागतपर भाषण दिले. ईश्वरीय अंश असलेले आपले भारतीय सैनिक म्हणजे आपल्याला लाभलेले वरदान आहे. रात्रंदिवस, उन पावसाची तमा न बाळगता सीमेवर आपल्या रक्षणासाठी लढणारे सैनिक म्हणजे आपल्या भारत देशाला लाभलेला दुवा आहे, असे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगून कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांना मानवंदना दिली व त्यांचे स्वागत केले. वयाच्या केवळ १९ व्या वर्षी सीमेवर असताना कारगिल युद्ध लढताना अपरंपार गोळ्या लागूनही लढत राहिलेले, १६ दिवस इस्पितळात उपचार घेत असतानाच "परमवीर चक्र" ची घोषणा घोषित केली गेली आणि ते नाव म्हणजे कॅप्टन योगेंद्र सिंह यादव. अंगावर शहारे आणणारे आणि हृदय पिळवटून निघणारे प्रसंग तंतोतंतपणे कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी त्यांच्या मुखातून वदन केले. कारगिल युध्दाच्या यशोगाथा व टायगर हील लढाई ची चित्र फित दाखवून व त्यावेळी घडलेल्या घटनांचा बारीक सारीक प्रसंग स्वतः कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी कथन केले.
स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेल्या कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी वयाच्या बाराव्या वर्षीच देशसेवा करण्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. आपण आपल्या भारत देशाचे मुले, मुली नसून सिंह आणि सिंहीण आहोत, पेन हातात घेतला तर डॉ.अब्दुल कलाम बना, तलवार हातात घेतली तर कोणतीही तमा न बाळगता देशासाठी लढा असे सांगून मुलांना प्रेरित केले. संपूर्ण तीन तासाच्या कार्यक्रमामध्ये दोन तास फक्त कॅप्टन योगेंद्र सिंह यादव हेच बोलत होते व उपस्थित सर्व श्रोते निःशब्द व मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. प्रत्येक कथन करणारा प्रसंग हा डोळ्यात पाणी आणि सर्वांच्या अंगावर शहारे आणणारा होता. अशा परमवीर चक्र सन्मानित कारगिल योध्दाला जे एम एफ संस्थेचा 'जे एम एफ राष्ट्रज्योत पुरस्कार २०२४' प्रदान करण्याचे भाग्य जे एम एफ संस्थेला लाभले. राष्ट्रज्योत पुरस्काराच्या प्रतिमेवर कोरलेले संक्षिप्त कथन संस्थेच्या सचिव माननीय डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी वाचून दाखवले. त्यानंतर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जे एम एफ संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव माननीय डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी पोलीस बँड च्या गजरात शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ, राष्ट्रज्योत पुरस्काराचे सन्मान चिन्ह आणि  रुपये २१,००० रक्कमेचा चेक कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांना प्रदान केला. सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात अभिवादन केले व वंदे मातरम् ची घोषणा केली. पद्मश्री गजानन राव माने, प्रवीण दुधे गणपती मंदिराचे अध्यक्ष, ऍड.वृंदा कुलकर्णी, भारत विकास परिषद सदस्य, तसेच अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. न भूतो, न भविष्याती असा हा चित्तरंजक सोहळा पाहण्यासाठी सुमारे एक हजार च्या आसपास प्रेक्षक वर्ग, तसेच शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन तरुणाई उपस्थित होती.

भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी.. सैनिक हो तुमच्यासाठी..

खरोखरच रोजची आपली जीवनचर्या हे आपल्या भारतीय सैनिकांचे आपल्याला लाभलेले वरदान आहे. कार्यक्रमाची सांगता पोलीस पथकाने बँडवर राष्ट्रगीत वाजवून केली गेली. सर्व  कलात्मक प्रशिक्षक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुव्यवस्थित पणें कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्रेया कुलकर्णी तर आभार प्रदर्शन श्री.एकनाथ चौधरी यांनी केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत