BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' संस्थेत सजला द्राक्षांचा मळा, त्याचा आनंद लुटण्यासाठी झाले बालगोपाल गोळा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२६ : निसर्गाच्या सान्निध्यात राहणे सर्वानाच आवडते. त्यातून फेब्रुवारी महिना म्हणजे द्राक्षांचा महिना, सर्व मुलांना आवडणारे फळ म्हणजे द्राक्षं. त्याचा आनंद लुटण्यासाठी 'जे एम एफ' मंडपात द्राक्षांचा मळा फुलवण्यात आला आणि द्राक्षां बरोबरच डाळिंब, कलिंगड, केळी, अननस अशी अनेक फळं  ठेवण्यात आली. मोठा मळा बनवून द्राक्षांचे घोस दोरीला लटकवून ठेवले गेले. ही संकल्पना अस्तित्वात आणली ते म्हणजे 'जे एम एफ' संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव माननीय डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी. मुलांच्या आनंदा मधे आनंद मानणारे कोल्हे दाम्पत्य नेहमीच काहीतरी नावीन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी सज्ज असतात.
सर्व कलात्मक शिक्षकांनी ही द्राक्षांची बाग बनवली. शिशुविहार ते इयत्ता आठवी पर्यंत सर्वच मुलांनी लटकवलेली द्राक्ष हात न लावता, उडी मारून द्राक्षं खाण्याचा आनंद घेतला. अनेक फळांनी सजवलेली ही बाग म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच होती. शिशु विहारच्या शिक्षकांनी सुंदर रित्या फळे कापून फळांचा केक, फळाचे प्राणी आणि सुबकरीत्या फळांचे तबक सजवून ठेवले होते. अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते बागेचे उद्घाटन करून सर्व मुलांनी एकच जल्लोष केला व स्वतः डॉ.श्री व सौ कोल्हे यांनी मुलांना त्यांच्या हाताने फळे खाऊ घातली. द्राक्षाच्या बागेत तऱ्हे तऱ्हेची खेळणी ठेवण्यात आली. सर्व मुलांनी त्या सर्व खेळण्याचा आनंद लुटला.
फलाहार हा आरोग्यासाठी नेहमीच चांगला असतो, रोज पिझ्झा, बर्गर, मॅगी न खाता फळांच्या ऋतुनुसार फळे  खावित, असे सांगून डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्वांना मनसोक्तपणे फळे खाऊ घातली. रोजच्या शालेय डब्यात देखील रोज एक फळ आणा आणि प्रतिकार शक्ती वाढवा असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना सांगितले.
'जन गण मन' सीबीएसई विद्यामंदिर तसेच पदवी व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व मुलांनी द्राक्षं महोत्सवाचा आनंद लुटला. शिशु विहार मधील अनेक छोट्या मुली, मुले शेतकरी वेशभुषेमधे आली होती, व स्वतःच्या हाताने फळांचे तबक घेऊन  आनंदाने वावरत होते. सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील 'जे एम एफ' द्राक्षांच्या बागेत बागडण्याचा आनंद मनमुरादपणे घेतला.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत