BREAKING NEWS
latest

केडीएमसीच्या नगररचना विभागातील दोघांना बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागात काम करणाऱ्या दोन जणांना बाजारपेठ पोलीसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली आहे. बाळू बहिराम आणि राजेश बागुल अशी या अटक करण्यात आलेल्या दोन अधिकारी आरोपींची नावे आहेत. या अटकेच्या घटनेनंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेचा नगररचना विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील डोंबिवली पश्चिमेतील गावदेवी परिसरात एका बिल्डरने एक इमारत तयार केली होती. या इमारतीसाठी लागणाऱ्या परवानगीकरिता बनावट नकाशा तयार केला होता. या प्रकरणाची तक्रार स्वतः केडीएमसीकडून करण्यात आली. कल्याणच्या बाजारपेठ पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. या प्रकरणाच्या चौकशीकरता संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांना पोलीस वारंवार चौकशी करण्यासंदर्भात बोलवत होते. मात्र ते चौकशीला सामोरे जात नव्हते. अखेर या दोघांना पोलीसांनी कायद्याचा बडगा उचलत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अटक करीत पालिकेत खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात सर्वेअर बाळू बहिराम आणि ड्राफ्ट्समन राजेश बागूल यांना अटक झाल्याने नगररचना विभागातील काही उच्चपदस्थ अधिकारी हे देखील अडकण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे. 

या दोघांना शुक्रवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केडीएमसी नगररचना विभागात अनेक अधिकारी, कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत आहेत. मध्यंतरी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी या विभागातील अनेकांच्या बदल्या करण्याचा आदेश पारित केला होता. मात्र तत्कालीन आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी या बदली आदेशाला स्थगिती देत बदल्या रद्दबातल केल्या होत्या. नगररचना विभागाला क्रीम पोस्टिंगचा दर्जा असल्याने त्यांची अन्य विभागात बदली करण्याची तसदी आजतागायत कोणताही महापालिका प्रशासक घेत नसल्याचे दिसून येत आहे. जरी बदली झाली तरी संबंधित अधिकारी तीन ते चार महिन्यात पुन्हा नगररचना विभागात कार्यरत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. नगररचना विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांमध्ये खाडाखोड करत बनावट कागदपत्रांच्या आधारे एकप्रकारे केडीएमसीची फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीसांनी अटक केल्यानंतर नगररचना विभागातील सावळा गोंधळ पुन्हा एकदा उजेडात आला. या प्रकरणात मोठे अधिकारी देखील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून नेहमी गजबजलेले नगररचना विभाग शुक्रवारी मात्र येथे शुकशुकाट पहावयास मिळत होता.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत