BREAKING NEWS
latest

कल्याणच्या भाजप आमदाराने शिवसेनेच्या शहरप्रमुखाला पोलीसांसमोर घातल्या गोळ्या..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

उल्हासनगर दि.०२ : येथील हिललाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय जगताप यांच्या केबिनमध्ये भाजप कल्याण (पूर्व) चे आमदार गणपत गायकवाड यांचा कल्याणचे शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड व त्यांचे साथीदार राहुल पाटील यांच्याशी एका विषयावर वाद झाला. त्यातून आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर शुक्रवारी रात्री गोळीबार केला. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सुरुवातीला स्थानिक रुग्णालय व नंतर ठाणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मुलाला धक्काबुक्की केल्याने गोळीबार केल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी मान्य केले असून त्यांना व त्यांच्या सुरक्षारक्षकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. 
महेश गायकवाड, राहुल पाटील आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यात एका विषयावरून सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर शिवीगाळ झाली आणि आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून आठ गोळ्या झाडल्या गेल्या. यामध्ये महेश गायकवाड यांना ४, तर राहुल पाटील यांना २ गोळ्या लागल्या आहेत. या प्रकाराने हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर दोन्ही गटांच्या समर्थकांनी पोलीस ठाणे व परिसरात गोंधळ घातला.

हिल लाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय  जगताप यांच्या केबिनमध्ये रात्री सुमारे ११ वाजता गोळीबार झाला. यापूर्वीही महेश गायकवाड व आमदार गणपत गायकवाड यांच्यात वादावादी झाली होती, असे पोलीसांचे म्हणणे आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत