BREAKING NEWS
latest

युती धर्माचे पालन करून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा - कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.१९ : दिवा शहरातील भाजपा पदाधिकारी सचिन भोईर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराने ही लोकसभा निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर लढावी अशा मागणीचे पत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष यांना दिल्याने कल्याण लोकसभा मतदार संघात या विषयावर खळबळ माजली होती. यामुळे महायुतीमध्ये कडवटपणा येवू नये म्हणून ताबडतोब कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हस्तक्षेप करून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेतली. या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना चव्हाण यांनी निर्देश दिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आणून हॅटट्रिक करायची आहे. एनडीए चारशे पार होण्यासाठी युतीधर्म पाळून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवडून आणून त्यांचीही हॅटट्रिक करायची आहे. यासाठी पूर्वीचे सर्व विसरा आणि निवडणुकीच्या कामाला लागा असे कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना निर्देश दिले.

डोंबिवली पूर्वेकडील ब्राम्हणसभा येथे बुधवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली-कल्याण लोकसभा क्षेत्र भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. यावेळी कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण ग्रामीण  तालुका प्रमुख महेश पाटील, भाजपचे माजी नगरसेवक राहुल दामले तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान चव्हाण यांनी सांगितले की, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराला सुरुवात करा, शिंदे यांची निश्चित हॅट्रिक होईल. कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे हे एकमेव एनडीएचे उमेदवार आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता कामाला सुरुवात करा. प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करून हॅटट्रिक करण्यासाठी सगळीकडे मोठा उत्साह आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत