BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांना 'इसरो' च्या रविशंकर यांच्या हस्ते 'भारत भूषण' पुरस्कार प्रदान..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि.१६ : अगणित पदव्या आणि पुरस्कार प्राप्त झालेले 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे शिल्पकार तथा सर्वेसर्वा डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांना विकसित भारत अभियान अंतर्गत, उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी 'भारत भूषण सन्मान' ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिनांक १४ एप्रिल रोजी वडोदरा येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात डॉ. राजकुमार कोल्हे आणि डॉ. प्रेरणा कोल्हे यांना नामांकन देण्यात आले व पुरस्कार जाहीर करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून झाली. तर विध्यार्थ्यांनी स्वागत नृत्य करून पाहुण्यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संगीत शिक्षिका श्रेया कुलकर्णी यांनी अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांचा जीवनप्रवास व पुरस्कार विषयी थोडक्यात कथन केले. अवघ्या काही दिवसातच तब्बल तीन उत्कृष्ट पुरस्काराचे मानकरी ठरलेले डॉ. राजकुमार कोल्हे तसेच डॉ. सौ प्रेरणा कोल्हे यांना दिनांक १६ एप्रिल रोजी 'जे एम एफ' संस्थेच्या मधुबन वातानुकुलीत दालनात 'भारत भूषण' ह्या उच्च कोटीच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून 'इसरो' चे प्रमुख इंजिनिअर डॉ. रविशंकर कुमार, तसेच बांदोडकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. श्री व सौ मोझेस, 'एम सी स्टेम एड्यूवर सिटी' चे अध्यक्ष डॉ. कुमार दत्त गांजरे यांच्या हस्ते डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांना पुरस्कृत केले. शाळा व महाविद्यालयचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, पालक, व विद्यार्थी यांनी टाळ्यांच्या गजरात डॉ. श्री. व सौ कोल्हे यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
सर्व विद्यार्थ्यांचे भाग्यच म्हणावे लागेल की 'इसरो' चे प्रमुख व 'इगनायटिंग ड्रीम्स ऑफ यंग माईंड्स' चे संशोधक डॉ. रवीशंकर कुमार यांनी अंतरीक्ष ज्ञान अभियानाबाबत भाषण देऊन 'इसरो' विषयक अनेक माहिती व ज्ञान दिले. अंतरीक्ष किंवा अंतराळ हा मुलांच्या कुतूहलाचा विषय आहे. नेहमीच विज्ञान विषयाचा अभ्यास करत असताना ग्रह, तारे, नक्षत्र बघताना मुलांना अप्रूप वाटते.  इंजिनिअर रविशंकर कुमार यांनी मुलांना अनेक सॅटेलाईट विषयक माहिती व ज्ञान देऊन मुलांना काही प्रश्न विचारले. त्यामधे इयत्ता आठवी मधील आरूष पांडे याने विचारलेल्या सर्व प्रश्नांची व प्रक्षेपणाची नावे सांगून अचूक उत्तरे दिली. त्या बद्दल रवीशंकर सरांनी त्याचे कौतुक करून 'इसरो' चे प्रशस्तीपत्रक दिले. व भविष्यात नक्कीच 'इसरो' मधे जाऊन 'जन गण मन' शाळेचे नाव उज्वल कराल अशी ग्वाही देखील दिली. त्याचबरोबर हर्ष बढे, इव्हा शॉ, अर्णव कदम ह्या विद्यार्थ्यांनी देखील समाधान कारक उत्तरे दिली व त्यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
'जे एम एफ' संस्थेमधून थेट प्रक्षेपण दिसणार असे 'इसरो' च्या एमओयु कागदपत्रांवर संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि इसरो चे प्रमुख इंजिनिअर रवीशंकर कुमार यांच्या मधे करार झाला. "जे एम एफ सॅट" (सॅटेलाईट ) ह्या नावाने प्रक्षेपण रुजू केले. भारत हा आपला देश आहे आणि हा देश अनेक भूषणाने विभूषित संपन्न असा आहे, असा हा आज 'भारत भूषण सन्मान ' आम्हाला प्राप्त होणे म्हणजे हा पुरस्कार शैक्षणिक ज्ञानदानाच्या कार्यासाठी मैलाचा दगड ठरला आहे असे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी कथन केले. त्याच बरोबर सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी देखील पुरस्कार मिळाल्याबद्दल, हा पुरस्कार कुण्या एकाचा नसून तो निरपेक्षपणे शैक्षणिक, सामाजिक जबाबदारी पार पाडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे असे कृतज्ञतापूर्वक उद्गार काढून उपस्थित सर्वांचे व ज्यांच्या आशीर्वादाने हा पुरस्कार प्राप्त झाला त्या प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेचे देखील आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता राय यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्चना शिंगटे यांनी केले. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत