BREAKING NEWS
latest

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या गेल्या दहा वर्षांच्या विकासकामाचा कार्य अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत


डोंबिवली दि.२१ : काही नकली वाघ कल्याण डोंबिवलीत येऊन पोकळ डरकाळ्या फोडून गेले परंतु मी रिंगमास्टर असून वाघाचे कातडे पांघरलेल्या शेळ्या आपण चांगल्या प्रकारे ओळखून आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. खासदार शिंदे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासकामांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह अन्य महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले की, श्रीकांत जरी डॉक्टर असला तरी मी राजकारणात अनेक सर्जऱ्या केल्या आहेत. त्यामुळे काहींचे मानेचे पट्टे निघाले, पटापट चालायला लागले, घराबाहेर पडले, हेही गरजेचे होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सहकार्य मागण्यासाठी लाज कशाला वाटली पाहिजे, असा सवाल करताना अहंकारी लोक आपल्या इगोसाठी राज्याचे नुकसान करतानाही आपण बघितल्याची टीकाही शिंदे यांनी केली.

डॉ. श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

आज मी आपल्यासमोर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुख्य नेता, या राज्याचा मुख्यमंत्री आणि तुमच्या खासदाराचा पिता म्हणून या तीन भूमिकेत उभा आहे. श्रीकांतच्या कामाबद्दल समाधानी असून त्याची गाडी राइट ट्रॅकवरच नाही तर फुल स्पीडमध्ये आहे. चौफेर विकास कसा करायचा, याची नस त्याला कळली असून २०१४, २०१९ मध्ये आपण त्याला निवडून दिलेत, आता २०२४ मध्येही तो हॅटट्रिक करेल, असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तबच केले.

दिल्लीत लोटांगण घालायला जात नाही

महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही दिल्लीला जातो. कोणालाही लोटांगण घालायला जात नाही. देशाचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात. यंदाची निवडणूक फक्त विकासाच्या मुद्यावर लढली जाणार असल्याचे मुख्यमंत्री या प्रकाशन सोहळ्यात म्हणाले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत