कल्याण दि.११ : ऐन २०२४ च्या लोकसभा निवडणूकीच्या मोक्यावर दिनांक ११.०५.२४ रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन साळवी यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली की राम मारुती चौक, कल्याण येथे संशयित रित्या गावठी कट्टा सारखे अग्नीशस्त्र घेऊन काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने एक इसम फिरत आहे. अशी बातमी मिळताच पोलीस हवालदार सचिन साळवी यांनी लगेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे डिटेक्शन इन्चार्ज सपोनि नवनाथ रूपवते यांनी त्यांच्या गुन्हा अन्वेशण पथकातील पोउनि. अजिंक्य मोरे, पोलीस हवालदार सचिन साळवी, प्रेम बागुल, परमेश्वर बाविस्कर, पोलीस नाईक अरुण आंधळे, यांनी राम मारुती चौक, चौधरी मोहल्ला येथे सापळा लावला आणि एका संशयीत आरोपीस शिताफिने पकडून ताब्यात घेतले.
पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक २५,६०० रुपये किंमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा, १ मॅग्झीन, ३ जिवंत काडतूस, असा मुद्देमाल मिळून आला. आरोपीचे नाव केतन शंकर बोराडे राहणार वाडेघर पाडा, कल्याण असे असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात वेग वेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीस बाजारपेट पोलीसांनी अटक केली असून, त्याने आतापर्यंत असे गावठी कट्टे किती व कोणाला विकले ? याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.