BREAKING NEWS
latest

डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरूच..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: डोंबिवली पूर्वेमध्ये असणाऱ्या एमआयडीसीमधील केमिकल कंपनीत काल मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की काही क्षणातच कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली. आगीनं रौद्ररूप धारण करत आसपासच्या तीन ते चार कंपन्याही आपल्या आगीत घेतल्या. संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. स्फोटामुळे डोंबिवली आणि आजूबाजूचा परिसर हादरला. हा स्फोट इतका भीषण आणि भयावह होता की, स्फोटामुळे डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. काहींच्या घराचे पिओपी स्लॅब देखील कोसळले.

या अग्नितांडवात आता पर्यंत मृतांचा आकडा ९ वर पाेहचला असून जखमींची संख्या एकूण ६५ झाली आहे. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफचे पथक व अग्निशामक दलाचे रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे. एमआयडीसी फेज मधील म्हात्रे पाडा, रिजेंसी इस्टेट, एमआयडीसी निवासी, सोनारपाडा इत्यादी भागात नुकसान झाले आहे. स्फोट झालेल्या परिसरातील नागरीक भयभयीत झाले आहे. काही वर्षांच्या अंतराने दुर्घटना होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याच बरोबर झालेल्या जिवित हानीला जबाबदार कोण? झालेल्या दुर्घटनेची जास्तीत जास्त दखल घेऊन कसूरवारास योग्य ती शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सर्वत्र नागरिकांकडून होत आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत