मुंबई : मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलात २३ जानेवारी २०२४ पासुन नियुक्ती दिलेल्या अग्निशामकांना सुमारे ४ महीन्यांपासुन वेतन न दिल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
मुंबई महापालिकेत नियुक्ती देणारे खाते कर्मचाऱ्यांना केवळ नियुक्ती पत्र देतात. सदर नियुक्ती पत्राच्या आधारे कर्मचारी संबधित विभागात किंवा खात्यात रुजू होऊन आपले कर्तव्य बजावतात. मात्र त्यांचे वेतन आकारताना कर्मचाऱ्यांच्या सर्व मूळ कागदपत्रांचे आर.एल.ऑडिट /लेखा अधिकारी (रजा पडताळणी) नव्याने केले जाते. या प्रक्रियेला खुपच वेळ लागत असल्याने, कर्मचाऱ्यांना महीनोंमहिने वेतन मिळत नाही. त्यामुळेच २३ जानेवारी २०२४ रोजी ‘अग्निशामक’ म्हणुन मुंबई पालिका सेवेत दाखल झालेल्या ४८० कर्मचाऱ्यांना सुमारे ४ महीने वेतन मिळालेले नाही. महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्यातुन नोकरीसाठी मुंबईत आलेल्या सामान्य कुटुंबातील सदर कर्मचाऱ्यांची उपासमार होऊ नये यासाठी त्यांना तात्काळ वेतन द्यावे अशी मागणी ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने'चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देणारे खाते/सक्षम अधिकारी, नियुक्ती देताना उमेदवारांचे सर्व कागदपत्र तपासुनच नियुक्त्या देतात. त्यामुळे सदर कागद पत्रे पुन्हा-पुन्हा तपासुन/पडताळणी करुन वेळ दवडणे व केलेल्या कामाचे वेतन वेळेवर न देणे अनुचित आहे. विशिष्ट कोट्यातून भरती झालेल्या ऊमेदवारांचेही आर.एल ऑडिट नव्याने केले जाते याचा फटका अलिकडेच भरती झालेल्या अपंग उमेदवारांनाही बसला आहे. कर्मचाऱ्यांना नियुक्ती देणाऱ्या खात्याने, कर्मचाऱ्यांचे कागदपत्र प्रमाणित करुन तसेच मास्टर क्रिएशन फॉर्म, नियुक्ती आदेशासोबतच कर्मचाऱ्यांना द्यावेत जेणेकरुन त्यांचे वेतन वेळेवर दिले जाईल व भविष्यात पेंशन क्लेम सुध्दा वेळेवर काढले जातील अशी मागणी डॉ.बापेरकर यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा