वाडा : मुंबई, जव्हार, कासा व वाडा अश्या विविध ठीकाणाहून चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात वाडा पोलीसांना यश आले असून एकूण सहा दुचाकी व तीन दुचाकी चोरांना वाडा पोलीसांनी अटक केली आहे. अगदी कमी वेळात ऐशो आरामात व स्टायलिश जीवन जगण्याच्या हव्यासाने महागड्या दुचाकी चोरून निव्वळ दहा-पंधरा हजार रुपयात दुचाकी विकणाऱ्या तिघांच्या टोळीला वाडा पोलीसांनी शिताफीने अटक केली आहे.
एक चोरटा हाती लागल्याने त्याची झाडून चौकशी केली असता इतर दोघांचा तपास लागला व त्यांच्याकडून पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. जव्हार येथून एक, कासा येथून एक, मुंबई येथून दोन तर वाड्यातून दोन दुचाकी हस्तगत करण्यात वाडा पोलीसांना यश आले आहे. यात 'यामाहा' कंपनीच्या आर १५ मॉडेलच्या निळ्या रंगाच्या तीन दुचाकी, एक सफेद रंगाची के.टी.एम, एक काळ्या-लाल रंगाची टी.व्ही.एस. स्कुटी तर एक काळ्या रंगाची स्प्लेंडर दुचाकी गाडी आहे. यातील चार दुचाकी प्रत्येकी रुपये दोन लाख किंमतीच्या आसपास आहेत. वाडा पोलीस ठाण्याचे गुन्हा अनवेशन पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके व त्यांच्या सहकाऱ्यांनी अगदी कमी वेळेत ही कारवाई मोठ्या शिताफिने केली आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके, पोहवा. विजय मढवी, पोशि. संतोष वाघचौरे, गजानन जाधव, भूषण खिलारे, यांनी ही कारवाई यशस्वीपणे केलेली आहे. अधिक चौकशी तपास करता आणखी दुचाकी वाहने मिळण्याची दाट शक्यता असून, नागरिकांनी आपल्या शेजारी एखादी व्यक्ती महागडी गाडी घेऊन फिरत असेल जी विकत घेण्याची त्याची ऐपत नाही, असा संशयित आढळल्यास पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी नागरिकांना केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा