BREAKING NEWS
latest

डोंबिवलीच्या स्फोटातील नुकसान झालेल्यांच्या घर, गाळे व चीजवस्तूंचे तत्काळ पंचनामे करून मृत्यूमुखी पडलेल्यांना ५० लाख रुपये भरपाई द्या; स्थानिक भूमिपुत्रांची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२४: डोंबिवलितील सोनारपाडा येथे गुरुवारी २३ तारखेला 'अमुदान केमिकल कंपनी' मधील स्फोटात ११ जण मृत्युमुखी तर सुमारे ६० जण जखमी झाले आहेत. याची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली. यावर स्थानिक भूमिपुत्रांनी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी आणि स्फोटातील नुकसान झालेल्यांची घर, गाळे व चीजवस्तूंचे तत्काळ पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली. शुक्रवार २४ तारखेला सोनारपाडा येथील स्फोटाच्या मागील बाजूच्या 'श्री साईबाबा मंदिर' येथे स्थानिक भूमिपुत्रांची बैठक पार पडली. या बैठकीत भूमिपुत्रांनी हा निर्णय एकत्रितपणे घेतला.
या बैठकीत गजानन पाटील, गणेश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, मधुकर माळी, रतन पाटील, सुनील पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, महादू म्हात्रे, भाऊ पाटील, रामचंद्र पाटील, हभप हनुमान महाराज, दशरथ म्हात्रे, दत्ता वझे, अजय पाटील, संदीप म्हात्रे, योगेश पाटील, मुरलीधर म्हात्रे, बाळाराम ठाकूर, पैलवान हरिश्चंद्र जाधव, मुकेश पाटील, अनंता पाटील यासह स्थानिक भूमिपुत्र आणि स्फोटात ज्यांच्या घराचे व गाळ्यांचे नुकसान झाले तेही उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेविका प्रमिला पाटील म्हणाल्या, उद्योग मंत्री उदय सामंत हे जरी केमिकल कंपनी स्थलांतरीत करण्याच्या धोरणात्मक निर्णयावर जरी बोलले असले तरी त्यांनी त्याबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. ही बैठक घेण्यामागचे कारण हेच आहे कि येथील रासायनिक केमिकल कंपनीचे स्थलांतर व्हावे. तर रतन चांगो म्हणाले, ही अत्यंत दुखद घटना आहे. मुत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना सरकारने किमान ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी. शासनाने धनाढ्य असलेल्या कंपन्यांचे सर्वे चालू केले मात्र या स्फोटात ज्यांच्या घराचे नुकसान झाले, ज्यांच्या गाळ्यांचे, चीजवस्तूंचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे अजूनही का सुरु झाले नाही? शासनाने त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी ही आमची एकत्रित मागणी आहे. भाऊ पाटील यांनी येथील रासायनिक कंपन्या स्थलांतरीत करावे अन्यथा स्थानिकांना रस्त्यावर उतरावे लागेल तर रामचंद्र पाटील म्हणाले, या स्फोटप्रकरणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊ. पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. डोंबिवलीत अनेक स्फोट झाले पण नुकसान भरपाई अद्याप दिली गेली नाही.
विकास करायचा भूमिपुत्रांच्या जमिनींवर आणि भूमिपुत्रांच्या तोंडाला पानं पुसायची अशी अवस्था शेतकरी भूमिपुत्राची झाली आहे. या स्फोटामुळे घर, गाळे आणि चीजवस्तूंचे नुकसान झाले. पूर्वीपासून येथील भूमीपुत्रांची मागणी आहे येथील रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर करावे. आजवर अनेक मोठे स्फोट झाली. शासनाने येथील रासायनिक कंपनीचे स्थलांतर करून भूखंड विकासाच्या घशात न टाकता भूमीपुत्राला विकासाच्या केंद्रबिंदू समजून साडे बारा टक्के विकसित भूखंड द्यावे अशी आमची राज्य शासनाला विनंती आहे असे गजाजन पाटील उपस्थित पत्रकारांसमोर म्हणाले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत