डोंबिवली दि.२६ : महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री नामदार रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून, 'डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार' आणि 'कल्याण-डोंबिवली रनर ग्रुप' यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीकरांसाठी आरोग्य आणि मैत्री दिनाची सांगड घालत ४ ऑगस्ट २०२४ रोजी कल्याण डोंबिवलीमधील सर्वात मोठ्या "डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२४" चे आयोजन केले गेले आहे. चालणे, धावणे किंवा पळणे आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. धकाधकीच्या शहरी वातावरणात आपल्या शरीराला व्यायाम अत्यावश्यक आहेच असं आरोग्यविज्ञान सांगते आणि त्यासाठी चालणे, धावणे किंवा पळणे यापेक्षा उत्तम काहीच नाही आणि हाच मूलमंत्र रुजवण्यासाठी नामदार रविंद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे.
"डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२४" ही स्पर्धा २१ कि.मी, १० कि.मी, ५ कि.मी आणि १.६ कि.मी. चा 'फन रन' (fun run) या टप्प्यांत आयोजित होणार आहे. १.६ कि.मी चा 'फन रन' हे या कार्यक्रमाचं आकर्षण असणार आहे जेथे ६ वर्षापासून ते वृद्धांपर्यत सर्वांचा सहभाग असेल. नामदार रविंद्र चव्हाण आणि कल्याण-डोंबिवली रनर ग्रुप तर्फे शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था इत्यादींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आज 'हॉटेल लिजंड' येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले.