BREAKING NEWS
latest

डोंबिवली पूर्वेकडील शेलार चौकात शिल्पा बार वर महापालिकेतर्फे निष्कासनाची तोडक कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२८ : डोंबिवलीतील कल्याण रोड शेलार चौकातील शिल्पा बारवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शुक्रवार दि.२८ तारखेला हातोडा मारत निष्कासनाची कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने केलेल्या या तोडक कारवाईसमयी कडक  पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी बारमधील सामान आधी बाहेर काढले त्यानंतर हातोडा मारला. भर पावसात सूरू असलेली कारवाई पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती.
कारवाई विरोधात बार चालक-मालक एकजुटले

कल्याण-डोंबिवलीत बार, पब, ढाब्यांवर कारवाई विरोधात बारचालक मालक एकजुटले आहेत. आम्ही डिपार्टमेंटला मॅनेज करतो, राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना भरभरून आर्थिक मदत करतो, शासनाचे सर्व टॅक्स भरतो, आपलं सरकार म्हणून आम्ही मतदान केलं, मग आमच्यावर कारवाई का ? असा बार चालकांचा सरकारला संतप्त सवाल आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने २७ जून रोजी कल्याण-डोंबिवली परिसरातील सात ते आठ बारवर तोडक कारवाई केली आहे. पुण्यातील घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेकायदेशीर बार, पब आणि ढाब्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. मात्र या कारवाईच्या विरोधात बालमालक चालक एकजुटले आहेत. कल्याण ग्रामीण भागातील रुक्मिणी बारवर महापालिकेने तोडक कारवाई केली. या कारवाईनंतर बारचालक आणि बार मालकाने या कारवाईला विरोध केला आहे.
बार चालक आणि मालकांचा विरोध

यावेळी बार चालकाचे आणि मालकांचे म्हणणे आहे की, आम्ही सरकारचे विविध कर भरतो, हॉटेल इंडस्ट्रीवर शेकडो लोकांचा उदरनिर्वाह होत आहे. कारवाई केल्यानंतर आम्हीच नाही तर हॉटेलवर उदरनिर्वाह असणारे शेकडो लोक रस्त्यावर येतील. मार्चमध्ये परवाना नूतनीकरण केला आहे, आपलं सरकार म्हणून आम्ही मतदान केलं आमच्या आजूबाजूला इतक्या अनधिकृत बिल्डिंग आहेत मग बारला टार्गेट का? आमच्यावरच कारवाई का? असा संतप्त सवाल बार चालकांनी केला आहे. सरकारने कारवाई करण्याआधी आम्हाला दुसरा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली अन्यथा आंदोलन करू असा संतप्त इशारा दिला आहे.
पुण्यात पब आणि हुक्का पार्लर घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यात शाळा कॉलेज परिसरातील अवैधरित्या सुरु असलेल्या ढाबे आणि टपऱ्या विरोधात कारवाईचे आदेश संबंधित प्रशासनाला दिले आहेत. ठिकठिकाणी कारवाई सुरु देखील झाली आहे. कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरात महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. कॉलेजच्या रस्त्याजवळच्या टपऱ्यां जेसीबीने पाडण्याचे काम सुरु आहे. मात्र या कारवाई आधी दुकानदारांनी विराेध केला. आत्ता दुकानदारांना पाठींबा देत शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख छाया वाघमारे यांनी कारवाईला विरोध केला आहे. या टपऱ्या अनधिकृत असल्याने महापालिकेने ही कारवाई सुरु केली आहे. मात्र छाया वाघमारे यांचे म्हणणे आहे की, प्रत्येक वेळी कारवाई होते. तेव्हा बिर्ला कॉलेजच्या गेटवरील दुकानावर कारवाई केली जाते. हे स्टॉल्स आहेत, ते गेल्या ३० वर्षापासून आहेत. हे विद्यार्थ्यांकरीता आहेत, त्याठिकाणी चहा, नाश्ता, पेन वही विकली जाते. या स्टॉल्सवरून अंमली पदार्थ विकले जात नाहीत. या स्टॉल्स धारकांचे पोट हातावर आहे. महापालिकेने त्यांना लायसन्स द्यावे. त्यांना ठाणे-मुंबईच्या धर्तीवर स्मार्ट स्टॉल्स द्यावेत अशी मागणी केली आहे.
केडीएमसी कारवाई चा  विरोध करणाऱ्या नेत्यांना आयुक्तांचा इशारा

या संदर्भात केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूरणी जाखड यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले की, मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश आहेत. या धर्तीवर कोणतेही अवैध धंदे करु द्यायचे नाहीत. त्या संदर्भातील आदेश महापालिका, पोलीस आणि उत्पादन शुल्क अधिकारी वर्गास दिले आहेत. कारवाईत कोणत्याही राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेप तसेच कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत