डोंबिवली दि.२७ : डोंबिवली शहरातील खोनी पलावा येथील केमिस्ट दुकानदारावर झोपेची गोळी न दिल्याने प्राणघातक हल्ला झाला.आरोपींना तात्काळ अटक करून अश्या प्रवृत्ती वर वचक बसवावा असे आवाहन डोंबिवली मेडिकल केमिस्ट असोसिएशनच्या वतीने मानपाडा पोलिसांना करण्यात आले. यापूर्वी मागील महिन्यात शास्त्री नगर हॉस्पिटल समोरील हंस मेडिकल वर देखील असाच हल्ला झाला होता.
शहरातील उच्चभ्रू वस्तीतील खोणी पलावा येथील संजीवनी मेडिकल येथे रात्री १०.३० वाजता झोपेची गोळी मागण्यात आली. प्रिस्क्रिप्शन नसल्याने गोळी देण्यास नकार दिल्याने सेल्समन सोबत हुज्जत घालून दुकानाबाहेर खेचत नेऊन त्यास मारहाण करण्यात आली. तसेच रॉड ने देखील मारहाण केली. सर्व घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली असून याबाबत मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये सीआरपीसी ३२३,३२४,५०४,५०६, ३४ नुसार दीपक अमृतलाल कपोडिया, दर्शन दीपक कपोडीया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केमिस्ट संघटनेच्या वतीने मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना निवेदन सादर करण्यात आले असून यावेळी चेअरमन निलेश वाणी, उपाध्यक्ष विलास शिरोडे, राजेश कोरपे तर सदस्य सुधीर दळवी, राहुल पाखले, दीपक बराई, किशोर आव्हाड, नितीन टिपरे, संजीवनी मेडिकल चे मालक शाहिद आफ्रिदी उपस्थित होते. आरोपीवर त्वरित कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी त्यांना दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा