BREAKING NEWS
latest

मुंबई महापालिकेकडून ठाण्याच्या पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात केल्याने काही भागात पाणी टंचाईचे संकट..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : मुंबई महापालिकेकडून ठाणे शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात लागू केली आहे. जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे ठाण्यातील काही भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार असल्याने येथील नागरिकांवर पाणी टंचाईचे संकट ओढावल्याचे चित्र दिसत आहे.

ठाणे शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५९० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून १२० दशलक्ष लीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यासाठी हे स्रोत महत्वाचे मानले जातात. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. हा जलसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा, या उद्देशातून मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी पाणी पुरवठ्यात ५ टक्के कपात लागू केली होती. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला मिळणाऱ्या पाणी पुरवठात पाच टक्के कपात लागू झाली होती. त्यापाठोपाठ आता जलाशयांमधील पाणीसाठ्यात आणखी घट झाल्यामुळे मुंबई महापालिकेडून ठाणे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात लागू केली आहे.
मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला ८५ दशलक्ष लीटर इतके पाणी दररोज मिळते. या पाण्याचा पुरवठा ठाणे शहरातील नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर. १, किसन नगर नं १, किसन नगर नं २, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नं १, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी कन्हैया नगर या परिसरात केला जातो. याच भागात आता १० टक्के पाणी कपात लागू झाली असून यामुळे येथील नागरिकांपुढे पाणी संकट उभे राहिले आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत