BREAKING NEWS
latest

कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी केली दुर्गाडी गणेश घाट परिसराची पाहणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी गणेश घाट येथे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रातील तसेच उल्हासनगर येथील मोठ्या श्रीगणेश मूर्ती प्रामुख्याने विसर्जनासाठी येत असतात. कल्याण मधील हे सर्वात मोठं नैसर्गिक विसर्जन स्थळ असल्यामुळे तेथे करण्यात आलेल्या तयारीची आज महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी पाहणी केली. या ठिकाणी असलेल्या दुर्गामाता चौकातून दुर्गाडी गणेश घाटाकडे जाण्यासाठी यापूर्वी दोन रस्ते होते. यातील एक रस्ता जाण्यासाठी व दुसरा रस्ता बाहेर येण्यासाठी वापरला जात होता. परंतू यातील एक मार्ग चालू वर्षी या ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या नेव्हल म्युझीयममुळे कायमस्वरुपी बंद झाला होता. त्यामुळे विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाची मागणी पोलीस विभाग तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. याकरीता सदर ठिकाणी रिंग रोडवर असलेल्या सीएनजी पेट्रोल पंपा पासून दुर्गाडी गणेश घाटापर्यंत पर्यायी रस्ता तयार करण्याचा निर्णय महापालिके मार्फत घेण्यात आला.

या ठिकाणी एकूण ११५ मी. लांब व १५ मी. रुंद रस्ता पेव्हर ब्लॉक लावून पुर्ण करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी वाहत असलेल्या नाल्यावर ६ फुट व्यासाचे ४ पाईप टाकुण पुल बनविण्यात आला आहे. याकरीता महापालिका निधीतून रु. २ कोटी इतका खर्च करण्यास महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच सदर काम कोणत्याही परिस्थितीत श्री गणेशोत्सवापूर्वी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एक महिन्याच्या कालावधीत दिवस-रात्र काम चालू ठेवून, ते पूर्ण करण्यात येत आहे.
सदर मार्गाने वाहने बाहेर पडून ट्रक टर्मिनल्सच्या जागेत असलेल्या रस्त्याच्या मार्गे मुख्य रस्त्याला नेण्यात येतील. यामुळे दरवर्षी दुर्गामाता चौकात विसर्जनाच्या दिवशी होणारी वाहतुक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. म‍हापालिकेमार्फत केलेल्या या रस्त्याच्या कामामुळे पोलीस विभाग तसेच नागरीक व श्री गणेशोत्सव मंडळांनी समाधान व्यक्त केले आहे. या पाहणी दौऱ्यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत