ठाणे : ठाणे विभागातून यंदा लालपरीची 'विक्रमी' स्वारी होणार आहे. ठाणे विभागीय कार्यालयाच्या आगारातून सुमारे दोन हजार ५०० बस किंवा त्यापेक्षा अधिक बसमधून गणेशभक्त गावी जाणार आहेत. त्यातील दोन हजार ४८१ बस फुल झाल्या आहेत. यामध्ये २ हजार ६४ बस ग्रुप बुकिंगच्या तर उर्वरित ४१७ बस आरक्षण बुकिंगच्या आहेत. गुरुवारी सर्वाधिक १ हजार ८८१ गाड्या कोकणात गणेशभक्तांना घेऊन रवाना झाल्या. एकूण बुकिंग गाड्यांपैकी जवळपास १ हजार २०० गाड्या या राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून बुक झाल्या आहेत.
शनिवार, ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. गौरी-गणपतीच्या सणाकरिता ३ ते ६ सप्टेंबर दरम्यान एसटी वाहतूक केली जाते. यंदा २ हजार ३२ गाड्यांचे नियोजन ठाणे (एसटी) विभागाने केले. त्यापेक्षा अधिक जवळपास ५०० गाड्यांचे बुकिंग झाल्याने २ हजार ४८१ बस फूल होऊन ठाणे विभागीय कार्यालयाची विक्रमी नोंद झाली. गतवर्षीपेक्षा यंदा ५०० अधिक गाड्यांचे बुकिंग झाले. ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
विविध सवलतींमुळे एसटीला पसंती देत पुन्हा प्रवासी एसटीकडे वळताना दिसत आहेत. दरम्यान, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बस सुटण्याची ही आहेत ठिकाणे
ठाणे - खोपट, बोरीवली, भाईंदर, मुलुंड, भांडुप, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी आणि दिवा.
गुरुवारी सर्वाधिक १,८८१ गाड्या रवाना
ठाणे विभागाकडून संपाच्या दिवसात योग्य नियोजन करून मंगळवार दि.३ सप्टेंबरला २२ तर बुधवार दि.४ सप्टेंबरला ४८२ गाड्या सोडण्यात आल्या. गुरुवारी ५ सप्टेंबरला सर्वाधिक १ हजार ८८१ गाड्या रवाना झाल्या. शुक्रवारी ६ सप्टेंबरला ९६ गाड्या सोडण्यात येणार आहेत.
या विभागांचा ठाण्याला मदतीचा हात
ठाणे विभागाच्या मदतीला एकूण १ हजार ७०० गाड्या धावून आल्या. गतवर्षीपेक्षा ६० गाड्या यंदा जास्त आहेत. यंदा मुंबई प्रादेशिक, पुणे प्रादेशिक आणि नाशिक प्रादेशिक येथील गाड्यांचा समावेश आहे.
जाताना पाच तर येताना तीन ठिकाणी थांबा
कोकणात मुंबई-गोवा महामार्गाने जाताना चहापान आणि नैसर्गिक विधीसाठी पाच हॉटेलच्या ठिकाणी थांबा दिला आहे तर येताना तीन ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा