डोंबिवली : डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पेंढरकर कॉलेजच्या अनुदानित प्राध्यापकांनी गुरुवारी शिक्षकदिनी काळे कपडे घालून कॉलेज प्रशासनाचा निषेध केला. आम्हाला न्याय कधी मिळणार? आमची उपेक्षा कधी थांबणार? असे संतप्त सवाल उपस्थित केले.
हे कॉलेज डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाकडून चालविले जाते. संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांनी कॉलेज अनुदानित असताना ते विनाअनुदानित करण्याचा घाट घातला आहे. ३ जूनपासून अनुदानित प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गास काम न देता एका वर्गाच्या खोलीत बसवून ठेवले जाते. कॉलेज प्रशासनाच्या विरोधात माजी विद्यार्थी सोनू सुरवसे यांनी बेमुदत साखळी उपोषण कॉलेजसमोर सुरू केले ते आजपर्यंत सुरू आहे. प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचारी वर्गास जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पगार दिलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंसह विभागीय शिक्षण संचालक आणि उच्च शिक्षण विभागाचे कोकण विभागीय उपसंचालकांकडे तक्रारी केल्या. शिक्षण संचालकाच्या पुणे कार्यालयाने अध्यक्षांना जाब विचारला तर अध्यक्षांनी त्यांच्या नोटीसविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉलेजवर प्रशासक नेमावा, असे आदेश दिले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा