ठाणे, दि.०२ : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व 'द अमॅच्युअर खो-खो असोसिएशन ठाणे' यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मावळी मंडळाने शतक महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या क्रीडांगणात प्रथमच विभागीय (राज्यस्तरीय) पुरुष आणि महिलांचे भव्य खो-खो स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत महिला गटात 'ज्ञानविकास फॉउंडेशन' संघ (ठाणे) व पुरुष गटात 'विहंग क्रीडा केंद्र' (ठाणे) यांनी अंतिम विजेतेपद पटकावले. महिलांच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या 'ज्ञानविकास फॉउंडेशन' संघाने ठाण्याच्या 'रा.फ.नाईक' संघावर १०-०८ असा १:१० मिनिटे राखून २ गुणांनी विजय मिळविला. ज्ञानविकास फॉउंडेशन संघाने नाणेफेक जिंकून संरक्षण घेतले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघाकडे ०५-०५ असे समसमान गुण होते. ज्ञानविकास फॉउंडेशन संघाच्या धनश्री कंक (२:४०, ३:२० मि. संरक्षण व २ गुण), दिव्या गायकवाड (२:२० मि. व ३ गुण) व रोशनी जुनघरे (१:४०, २:२० मि. संरक्षण व १ गुण) यांनी संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. पराभूत रा.फ.नाईक संघाकडून श्वेता जाधव (१:१० मि. संरक्षण व ३ गुण), रुपाली बडे (२:४०, १:४० मि. संरक्षण) व गीतांजली नरसाळे (१:३०, ०३:५० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ करीत पराभव टाळण्याचा प्रयत्न केला पण त्या यशस्वी ठरल्या नाहीत.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या विहंग क्रीडा केंद्रने मुंबई उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी संघावर १५-१० असा ०५ गुणांनी विजय मिळविला. विहंगने नाणेफेक जिंकून संरक्षणाची निवड केली. मध्यंतरापर्यंत विहंगने आक्रमक खेळ करीत ०८-०४ अशी ०४ गुणांची आघाडी घेतली. विहंगच्या आशिष गौतम (१:५०, १:५० मि. संरक्षण व ३ गुण), आकाश तोगरे (२:४०, २:३० मि. संरक्षण), लक्ष्मण गवस (२:०० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर, शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स ऍकॅडेमीच्या रामचंद्र झोरे (२, २ मि. संरक्षण व १ गुण), धीरज भावे (१, १.४० मि. संरक्षण व २ गुण) व प्रतीक देवरे (१:१०, १:५० मि. संरक्षण) यांनी पराभवात सुध्दा जोरदार खेळ केला.
स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरणाचा समारंभ प्रमुख पाहुणे मा. उमेश साळवी (सेवानिवृत्त न्यायाधीश - मुंबई उच्च न्यायालय) यांच्या शुभहस्ते झाला. त्यांच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष सुनील करंजकर, चिटणीस रमण गोरे, सहाय्यक चिटणीस चिंतामणी पाटील, खजिनदार रिक्सन फर्नांडीस, विश्वस्त कृष्णा डोंगरे, विश्वस्त पॅट्रिक फर्नांडीस, विश्वस्त रवींद्र आंग्रे, विशवस्त केशव मुकणे हे उपस्थित होते. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन सहकार्यवाह व स्पर्धा निरीक्षक बाळासाहेब (बाळ) तोरसकर, 'द अमचुयर खो-खो असोसिएशन ऑफ ठाणे'चे कमलाकर कोळी (उपाध्यक्ष), मंदार कोळी (चिटणीस), नरेंद्र कुंदर (चिटणीस-उपनगर) संदेश आंब्रे इ. उपस्थित होते.
स्पर्धेतील पारितोषिके :
महिला गट / पुरुष गट
अंतिम विजेता :
ज्ञानविकास फॉउंडेशन संघ (ठाणे),
विहंग क्रीडा केंद्र (ठाणे)
अंतिम उपविजेता :
रा.फ.नाईक संघ (ठाणे),
शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो.ऍकॅडेमी (उपनगर)
तृतीय क्रमांक :
शिवभक्त स्पोर्ट्स क्लब (ठाणे),
सरस्वती क्रीडा केंद्र (मुंबई शहर)
चतुर्थ क्रमांक :
शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. ऍकॅडेमी (उपनगर)
ग्रिफिन जिमखाना (ठाणे)
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
महिला गट / पुरुष गट
उत्कृष्ट संरक्षक :
दिव्या गायकवाड (ज्ञानविकास),
रामचंद्र झोरे (शिर्सेकर्स महात्मा गांधी)
उत्कृष्ट आक्रमक :
श्वेता जाधव (रा.फ.नाईक)
आशिष गौतम (विहंग)
अष्टपैलू खेळाडू :
धनश्री कंक (ज्ञानविकास)
आकाश तोगरे (विहंग)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा