BREAKING NEWS
latest

भारतीय अंतराळवीर अवकाशात करणार योगाभ्यास..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : ईसरो यावर्षी पहिल्यांदाच अवकाशात अंतराळवीर पाठविणार आहे. या अवकाश मोहिमेतील स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाचे सारथ्य करणारे पहिले भारतीय अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर योगाभ्यास करणार आहेत. तसेच अवकाश तळावर ते आपल्या सहकाऱ्यांना भारतीय पद्धतीचे भोजनही देणार आहेत. या मोहिमेवर कॅप्टन शुक्ला यांच्यासह पोलंडचे स्लावोस्झ उझनान्स्की-व्हिस्नीव्हस्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे अंतराळवीर असणार आहेत. मोहिमेचे नेतृत्व पेगी व्हिटसन करणार आहेत.

एक्सियम - ४ नावाची ही मोहीम ईसरोची अंतराळात मानवाला पाठविणारी पहिलीच मोहीम आहे. यावर्षी हिवाळ्यानंतर ही मोहीम ईसरो हाती घेणार आहे. अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या ड्रॅगन यानाच्या साह्याने या मोहिमेवर कॅप्टन शुक्ला आणि त्यांचे सहकारी यांना आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर पाठविले जाणार आहेत. 

या अवकाश सफरीबद्दल बोलताना कॅप्टन शुक्ला म्हणाले की, या संधीचा मी पुरेपूर उपयोग करून घेणार आहे. अवकाश तळावर मी योगाभ्यास करणार आहे. तसेच सहकाऱ्यांना भारतीय पध्दतीचे जेवणही देणार आहे. मी जरी एकटा अंतराळात जात असलो तरी दीड अब्ज भारतीयांची ही सफर आहे. अवकाशातून माझ्या डोळ्यांनी मी जे पाहीन ते कॅमेऱ्यात कैद करून तमाम देशवासियांशी शेअर करणार आहे. विंग कमांडर राकेश शर्मा यांनी १९८४ साली अवकाशाची सफर केली होती. ते भारताचे पहिले अंतराळवीर ठरले. आता त्यांच्यानंतर ही दुर्मिळ संधी कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना मिळणार आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत