BREAKING NEWS
latest

आमदार सूर्यकांत दळवी यांचा दिवा ते दापोली एसटी बस सुरू करण्याच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.२ फेब्रुवारी : दिवा ते दापोली एसटी बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी कोकणकर प्रतिष्ठानचे संस्थापक व भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ठाणे जिल्हा सरचिटणीस डॉ. सतीश केळशीकर यांनी दापोलीचे आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिवा शहरातून दर शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पनवेल– गोरेगाव– मंडणगड– दापोली शिवाजीनगर मार्गे उन्हवरे येथे एसटी बस सेवा सुरू करावी तसेच दर रविवारी याच मार्गावरून परतीसाठी एसटी बस सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दिवा शहरासह आजूबाजूच्या परिसरात दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील हजारो कोकणवासी कुटुंबे स्थायिक आहेत. नोकरी व व्यवसायानिमित्त येथे वास्तव्यास असले तरी त्यांचे मूळ गाव, शेती आणि नातेवाईक कोकणात आहेत. शनिवार-रविवारच्या सुट्टीत गावी जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने प्रवासात मोठी गैरसोय सहन करावी लागते.

ही गैरसोय दूर करण्यासाठी दर शनिवारी रात्री १० वाजता दिवा येथून पनवेल– गोरेगाव– मंडणगड–दापोली शिवाजीनगर मार्गे उन्हवरे आणि दर रविवारी रात्री ८ वाजता उन्हवरे शिवाजीनगर येथून दापोली–मंडणगड– गोरेगाव– पनवेल– दिवा अशी एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

ही सेवा सुरू झाल्यास ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसह प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर होईल, तसेच एसटी महामंडळालाही चांगला महसूल मिळेल, असा विश्वास डॉ. सतीश केळशीकर यांनी व्यक्त केला. यावर आमदार सूर्यकांत दळवी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत