BREAKING NEWS
latest

शिवसेना दिवा शहर प्रभाग २८ मधील प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ तथा शक्तीप्रदर्शन..

विशेष प्रतिनिधी

दिवा : शिवसेना दिवा शहर प्रभाग क्रमांक २८ मधील प्रचाराचा शुभारंभ आज शिवसेना शहरप्रमुख तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी सपत्नीक गणेशाची आरती करून व नारळ फोडून केला. यावेळी ‘जयजय महाराष्ट्र माझा’ या गीताच्या गजरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

यानंतर गणेश नगर येथील गणेश मंदिरापासून दातिवली येथील मध्यवर्ती शाखेपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमास पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जमलेल्या उत्स्फूर्त गर्दीमुळे प्रभाग क्रमांक २८ मधील सर्व नगरसेवक निवडूनच आल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होता.
तर शिवसेना शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी उत्स्फुर्त असे कार्यकर्त्यांना संबोधित भाषण केले. त्यात त्यांनी म्हटले की “गेल्या आठ वर्षांत दिव्यात विकासकामे जी झालेली आहेत, त्याच जोरावर आगामी निवडणुकीत शिवसेनेचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच उमेदवार कोण हे न पाहता 'धनुष्यबाण' हीच आपली निशाणी आणि एकनाथ शिंदे हेच आपले नेतृत्व आहे, हे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा," असे आवाहन मढवी यांनी कार्यकर्त्यांना केले. तर शेवटी मढवी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना प्रत्येक नागरिकाच्या 'घरोघरी जाऊन संवाद साधण्याचे' आणि गेल्या पाच वर्षांतील दिव्यातील कामांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले. प्रचाराच्या या भव्य शुभारंभामुळे प्रभाग २८ मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला चांगलीच धार मिळाल्याचे चित्र दिसून आले.

या वेळी शिवसेना शहरप्रमुख तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी, उपशहरप्रमुख गणेश मुंडे, ऍड. आदेश भगत, माजी नगरसेवक दीपक जाधव, माजी नगरसेविका दर्शना म्हात्रे, सुनीता मुंडे, विभागप्रमुख अरुण म्हात्रे, केशव म्हात्रे, सचिन चौबे, चरणदास म्हात्रे, जगदीश भंडारी, राजेश पाटील, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना, युवतीसेना साक्षी मढवी तसेच अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंचित मुलींसाठी 'रोशन सफर'तर्फे शिक्षण सहाय्य कार्यक्रमाचे आयोजन..

विशेष प्रतिनिधी

कल्याण : भारतातील वंचित मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रित करणारी एक 'ना-नफा' या तत्त्वावर चालणारी संस्था 'रोशन सफर'तर्फे सोमवार, दिनांक २२ डिसेंबर रोजी कल्याणमधील एका शाळेत विशेष सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या वंचित समुदायातील मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जागरूकता करणे आणि निधी उभारणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. लक्ष्यित शैक्षणिक पाठबळ आणि सामुदायिक सहभागाद्वारे, 'रोशन सफर' शालेय शिक्षणातील सर्वांगी अडथळे दूर करण्यासाठी आणि तरुण मुलींना दीर्घकालीन सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कार्य करते.

या उपक्रमाचे आयोजन शालेय वातावरणात करणे हे शिक्षणाप्रती असलेली त्याची खोलवर बांधिलकी दर्शवते आणि समर्थकांना अशा वातावरणाशी थेट जोडले जाण्याची संधी देते, ज्यांना अधिक बळकट करण्याचा हा उपक्रम प्रयत्न करत आहे. हा कार्यक्रम शिक्षणाच्या उपलब्धतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना येणाऱ्या आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो. 'रोशन सफर'च्या शैक्षणिक सक्षमीकरणाच्या व्यापक ध्येयाला पुढे नेण्यात हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. या उपक्रमाद्वारे उभारण्यात आलेला निधी वंचित मुलींच्या शिक्षणासाठी वापरला जाईल, ज्यामध्ये शाळेची शुल्क, शिक्षण साहित्य आणि सातत्यपूर्ण उपस्थिती आणि शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक संसाधने यांचा समावेश असेल.

आर्थिक मदतीव्यतिरिक्त, हा उपक्रम तरुण मुलींना सक्षम बनवण्यात, त्यांच्या कुटुंबीयांना बळकटी देण्यात आणि दीर्घकालीन सामुदायिक विकासाला चालना देण्यात शिक्षणाचे परिवर्तनकारी परिणाम अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतो. 'रोशन सफर'ला मिळालेला नवा वेग त्याच्या नेतृत्वाच्या प्रयत्नांशी निगडित आहे. या कार्यक्रमाचा पाया रचणाऱ्या आपल्या दिवंगत आजोबांच्या निधनानंतर, झोया खान यांनी त्यांचा हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारली.

झोया खान यांनी संस्थेचे कामकाज आणि आर्थिक बाबी समजून घेण्यात स्वतःला झोकून दिले, निधी संकलनाचे प्रयत्न अधिक बळकट केले आणि दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित केली. चॅरिटीची (धर्मादाय संस्थेची) डिजिटल उपस्थिती म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञान आणि ऑनलाईन माध्यमांचा वापर करून, देणगीदारांपर्यंत पोहोच विस्तारून आणि परिणाम व प्रगतीबद्दल नियमित संवाद साधून, त्यांनी भारतातील मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी यूएसडी २०,००० (वीस हजार अमेरिकन डॉलर)हून अधिकचा निधी यशस्वीरित्या उभा केला आहे.

या कार्यक्रमात विद्यार्थी, समर्थक आणि समुदाय सदस्यांना गुंतवून ठेवण्याच्या उद्देशाने विचारपूर्वक आखलेल्या किंवा निवडलेल्या अनेक उपक्रमांचा समावेश असेल. यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद, शिक्षणाचे मूल्य अधोरेखित करणारे शैक्षणिक सत्र, विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिक्षण साहित्याचे वितरण यांचा समावेश आहे. एकत्रितपणे, हे उपक्रम एक अर्थपूर्ण अनुभव तयार करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत, जे 'रोशन सफर'चे ध्येय प्रतिबिंबित करतात आणि त्याच्या प्रभावाची प्रचिती देतात.

हा उपक्रम शैक्षणिक समतेच्या समान दृष्टिकोनातून वचनबद्ध व्यक्ती आणि सहयोगकर्त्यांच्या गटाद्वारे समर्थित आहे. झोया खान आणि तिचे कुटुंबीय 'रोशन सफार'च्या प्रयत्नांना मार्गदर्शन आणि पाठिंबा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी शाळा आणि समुदायाशी जवळून काम करणारे जुनैद शेख स्थानिक पातळीवर या कार्यक्रमांबाबत समन्वय साधत आहेत. या कार्यक्रमात अमेरिकेतील जगप्रसिद्ध तबलावादक जिम सँटी ओवेन एक अनोखा सांस्कृतिक पैलू जोडत आहेत, ज्यांची उपस्थिती 'रोशन सफर'च्या ध्येयामागील जागतिक पाठिंबा आणि ऐक्य दर्शवते. 

'रोशन सफर'च्या सह-संस्थापक, यूएसमधून मुख्य निधी उभारणाऱ्या, आणि सोशल मीडिया संचालक झोया खान यांनी उपक्रमाच्या उद्देशावर भाष्य करताना सांगितले, की जेव्हा मी माझ्या दिवंगत आजोबांकडून 'रोशन सफर'ची अमेरिकन शाखा हाती घेतली, तेव्हा मला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या समुदायातील मुलींना मोठे स्वप्न पाहण्यास मदत करण्याची आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना संसाधनांनी सुसज्ज करण्याची संधी दिसली. शिक्षणात जीवनमान बदलण्याची ताकद आहे आणि या उपक्रमाद्वारे आम्हाला कायमस्वरूपी बदलाचे मार्ग तयार करण्याची आशा आहे. 'रोशन सफर' संस्था आशा, लवचिकता आणि संधीचे प्रतीक म्हणून उभी आहे, जी वंचित मुलींसाठी शिक्षणाला पुढे नेण्याच्या सखोल वचनबद्धतेने प्रेरित आहे. कल्याण येथील शाळेतील कार्यक्रमासारख्या उपक्रमांद्वारे, संस्था आपला उद्देश कृतीत उतरवते, जिथे सर्वात जास्त गरज आहे तिथे संधी निर्माण करते, आत्मविश्वास वाढवते आणि क्षमतांचे संगोपन करते. 'रोशन सफर' व्यक्ती, संस्था आणि समुदायांना त्यांच्या मिशनला (मोहीम) पाठिंबा देण्यासाठी आणि प्रत्येक मुलीला शिकण्याची, वाढण्याची आणि नेतृत्व करण्याची संधी मिळावी, या सामूहिक प्रयत्नाचा भाग बनण्यासाठी आमंत्रित करते.

'ग्लोबल इंग्लिश स्कूल'तर्फे पहिल्या वार्षिक कार्निव्हल मेळ्याचे भव्य आयोजन..

विशेष प्रतिनिधी

दिवा – ग्लोबल इंग्लिश स्कूल, दिवा (पूर्व) यांनी २० व २१ डिसेंबर रोजी रुणवाल ग्राउंड येथे शाळेचा पहिला वार्षिक कार्निव्हल मेळा मोठ्या उत्साहात साजरा केला. सदर कार्यक्रम हा दोन दिवस आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमास पहिल्या दिवशी मुंब्रा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व दुसऱ्या दिवशी नितीन पगार पोलीस निरीक्षक मुंब्रा पोलीस स्टेशन व राजू पाचोरकर पोलीस निरीक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते. 

सन्मानीय अतिथी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली व त्याचे उपस्थितिने कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमात रंग भरला. या मेळ्यात नृत्यप्रस्तुती, लाईव्ह गायन, जादूचे प्रयोग, मिमिक्री तसेच टॅलेंट हंट अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांचे प्रभावी सादरीकरण केले. याशिवाय विज्ञान प्रदर्शन, मनोरंजक खेळ, विविध राईड्स आणि शिक्षक-विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला खाद्यपदार्थ विभाग हेही विशेष आकर्षण ठरले. पालक, विद्यार्थी व शिक्षक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेचा पहिला कार्निव्हल मेळा यशस्वी व अविस्मरणीय ठरला.

महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजप पुन्हा नंबर १चा पक्ष..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विकासाभिमुख राजकारण व  भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे संघटन कौशल्य आणि अचूक निवडणूक नियोजन यांच्या जोरावर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात प्रथमच नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक निकालात अभूतपूर्व असे यश मिळवले आहे. महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मुखातून देवेंद्र आणि रविंद्र या जोडगोळीचा नेहेमी होणार आदरार्थी उल्लेख हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनी सार्थ ठरवला. यंदाच्या निवडणुकीत प्रचारगीतातून गाजलेले "तुमची आमची भाजपा सर्वांची" हे बोल महाराष्ट्रातील जनतेने खरे करून दाखवले, हे या निकालावरून सिद्ध झाल्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

रविंद्र चव्हाण यांनी सहा महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर अतिशय शिस्तबद्धपणे आणि संयम व आक्रमकपणाच्या अनोख्या शैलीतून महाराष्ट्र पिंजून काढला. यादरम्यान अनेक दिग्गज नेते त्यांनी भाजपात आणले. कोकणात वर्चस्व असलेल्या रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाचा खरंतर या निवडणुकांच्या निमित्ताने कस लागला, त्यात रविंद्र चव्हाण पैकीच्या पैकी गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. राज्यात अनेक ठिकाणी शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याशी भाजपाची लढत होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या चातुर्यामुळे आणि रविंद्र चव्हाण यांच्या संघटन कौशल्यामुळे अनेक ठिकाणी लढत जिंकली. 

मात्र त्याचवेळी राज्यात सत्तास्थानाला किंवा महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचं गणित देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांनी एकत्रितपणे अचूक सोडवले. याबरोबरच उद्धव सेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीला भाजपने त्यांची जागाही दाखवली असे दिसते. श्रीकांत शिंदे यांच्याशी असलेले रविंद्र चव्हाण यांचे प्रेम व तिरस्कार असे दुहेरी संबंध गेल्या काही दिवसांतील भाजपा पक्ष प्रवेशामुळे अधिक गहिरे होतील का?, अशी शक्यता निकालांमुळे झाली आहे. जानेवारीत होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या बाबतीतही देवेंद्र-रविंद्र यांची किमया चालेल अशीच शक्यता अधिक असल्याने मात्र महायुतीतील सहकारी पक्ष आता कशी व्यूहरचना करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

'करवी इंटरनॅशनल स्कूल'मध्ये तिसरा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न..

विशेष प्रतिनिधी

दिवा :  'करवी इंटरनॅशनल स्कूल'मध्ये तीन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या क्रीडा महोत्सवात प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी व सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने सहभाग नोंदवला.
या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या मोटर स्किल्सच्या विकासावर विशेष भर देण्यात आला होता. शाळेच्या पटांगणात विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण व वयोगटाला अनुरूप खेळ आयोजित करण्यात आले होते. सॅक रेस, लेमन अँड स्पून रेस, बॉल इन द बास्केट, कप टॉवर, फ्रॉग जंप, बलून बॅलन्स तसेच कॉन्सेंट्रेशन ऍण्ड कॉ-ऑर्डिनेशन यांसारख्या खेळांमध्ये चिमुकल्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या क्रीडा महोत्सवाचे आयोजन शाळेच्या प्राचार्या कविता खंडेराव यांच्या नेतृत्वाखाली व शाळेचे संस्थापक रविंद्र वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, उत्साह आणि आत्मविश्वास यामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला.
या यशस्वी क्रीडा महोत्सवासाठी शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह व खेळांतील धमालमुळे हा क्रीडा महोत्सव सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.

दिवा शहरातील तलाव स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; भाजप दिवा मंडळाची तातडीच्या कारवाईची मागणी..

विशेष प्रतिनिधी

दिवा : दिवा शहरातील स्टेशन परिसरात असलेल्या तलावाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून, तलावामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक, सांडपाणी साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली  असून आरोग्याचा प्रश्न उद्भवला आहे. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत भारतीय जनता पार्टी, दिवा शहर मंडळाचे अध्यक्ष सचिन रमेश भोईर यांनी दिवा प्रभाग समिती व महापालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तलावाच्या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. याचा फटका परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत असून, प्रशासनाने याकडे तात्काळ गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
भाजप दिवा मंडळाच्या वतीने तलावाची तातडीने स्वच्छता करून कचरा काढून टाकावा, तसेच भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी नियमित देखभाल व स्वच्छतेची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. या गंभीर विषयाकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर होऊ शकतो, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

प्रवाशांच्या खिशावर भार देत तिकिटांचे दर वाढवत नवीन वर्षाआधी रेल्वेचा मोठा धक्का..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली:  नाताळचा सण आणि नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर भारतीय रेल्वेने लाखो प्रवाशांना मोठा आर्थिक झटका दिला आहे. रेल्वेने तिकिटांच्या दरात वाढ जाहीर केली असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. रविवार, २६ डिसेंबर २०२५ रोजी रेल्वेकडून नवीन भाडे यादी जाहीर केली जाणार असून, या भाडेवाढीतून रेल्वेला सुमारे ₹६०० कोटींचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

२१५ किमीपेक्षा जास्त प्रवासासाठीच भाडेवाढ

सामान्य श्रेणी (जनरल क्लास): २१५ किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी प्रति किलोमीटर ₹१ मेल/एक्सप्रेस, नॉन-एसी आणि एसी श्रेणी: प्रति किलोमीटर ₹२ वाढ २१५ किमीपेक्षा कमी अंतराच्या प्रवासासाठी भाड्यात कोणताही बदल नाही.

५०० किमी प्रवासावर किती भार ?

नॉन-एसी श्रेणीमध्ये ५०० किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल ₹१० जास्त मोजावे लागणार आहेत.

दिलासा कोणाला ? 

निम्न व मध्यम वर्गीय प्रवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ,उपनगरीय लोकल मासिक हंगामी तिकिटे (पास) या तिकिटांच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

नाताळ–नवीन वर्षासाठी खुशखबर! २४४ विशेष रेल्वे फेऱ्या

प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेत भारतीय रेल्वेने नाताळ आणि नवीन वर्षासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व आठ झोनमध्ये २४४ अतिरिक्त विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

कोणते मार्ग असणार विशेष ?

दिल्ली, हावडा, लखनौ आणि आसपासची शहरे
मुंबई–गोवा (कोकण) कॉरिडॉरवर विशेष दैनिक व साप्ताहिक गाड्या
मुंबई–नागपूर, पुणे–सांगनेर आणि महाराष्ट्रातील प्रमुख मार्गांवर अतिरिक्त सेवा
घराकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि सुट्टीसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे.

तिकिटांच्या दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी असली तरी, सणासुदीच्या काळात सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्यांमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. आता प्रवाशांचे लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे तिकिट मिळते का ? आणि किती महाग पडते ?