BREAKING NEWS
latest

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे प्रभाग क्र. २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी तर प्रभाग क्र. २८ मधून हर्षल मोरे असे चार उमेदवार बिनविरोध विजयी..

विशेष प्रतिनिधी

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी तर प्रभाग क्र. २८ मधून हर्षल मोरे असे शिवसेनेचे चार नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे. यामुळे यांच्यासमवेत प्रभागात उभे असलेल्या भाजपच्या ज्योती पाटील यांदेखील विजयी झाल्या आहेत. यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आपले खाते उघडले आहे. कल्याण-डोंबिवलीत महायुतीचा महापौर शतप्रतिशत बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. तर येत्या दोन दिवसात इतर काही प्रभागात ही शिवसेनेचे काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. २४ मधील निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात शिवसेनेचे स्थान अधिक भक्कम केले आहे.  या प्रभागात शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तसेच प्रभाग क्र. २८ मधून हर्षल मोरे ही बिनविरोध निवडून आले आहेत. चारही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेला मिळालेला हा बिनविरोध विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि शिवसेनेवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे बोलले जात आहे. तर या चारही नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे. 

शिवसेनेकडून प्रभागातील गटबाजी आटोक्यात ठेवत स्थानिक पातळीवरील समन्वय, संवाद आणि संघटनशक्ती या घटकांचा या निकालात महत्त्वाचा वाटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चारही जागांवर शिवसेनेचा बिनविरोध विजय म्हणजे या भागातील सत्तेचे समीकरण मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. निकाल जाहीर होताच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हा विजय शिवसेनेसाठी केवळ निवडणुकीतील यश नसून आगामी महापालिका राजकारणात आत्मविश्वास मिळवून देणारा निर्णायक टप्पा ठरणार आहे. 

यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेवर महायुतीचा महापौर बसणार आणि यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ही सर्वाधिक राहणार असल्याचे हे चार नगरसेवक उमेदवार बिनविरोध निवडून आले असल्याचे द्योतक मानले जात आहे.

३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध जे जे रुग्णालयात १९९२ साली घडलेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा खटला आता ३३ वर्षांच्या विलंबानंतर पुढच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या खटल्यात विशेष टाडा न्यायालयाने दोन आरोपींच्या विरोधात अतिरिक्त पुराव्यांची नुकतीच नोंद करून घेतली आहे. फारुख मन्सुरी ऊर्फ फारुख टकला आणि त्रिभुवन रमापती सिंह ऊर्फ श्रीकांत राय या दोन आरोपींविरूद्ध अतिरिक्त पुरावे नोंदवण्यात आले आहेत.

विशेष न्यायालयाच्या या निर्णयामुळे खटल्याची कार्यवाही पुन्हा गती धरली आहे. यामुळे या प्रकरणातील न्यायलयीन प्रक्रियेत पुढील टप्प्यांसाठी मार्ग मोकळा झाला असून, आरोपींविरुद्ध पुरावे अधिक तपासल्या जाणार आहेत. विशेष टाडा न्यायालयात पोलिसांनी दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये गोळीबाराच्या संपूर्ण घटनाक्रम देण्यात आला आहे.

रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये अचानक बेछूट गोळ्यांचा वर्षाव झाला. अवघ्या काही सेकंदात होत्याच न्हवत झालं. ३३ गोळ्या झाडल्या गेल्या आणि संपूर्ण मुंबई या हत्याकांडाने बिथरली. मागच्या काही वर्षातील पोलीस रेकॉर्डनुसार, अरुण गवळीचा विश्वासू साथीदार शैलेश हळदणकर या मारेकऱ्यांचे लक्ष्य होता. त्यावेळी हल्ल्याच्या काही दिवस आधी शैलेश हळदणकर एका चकमकीत जखमी झाला होता आणि तातडीने पोलीस बंदोबस्तात रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.

सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास, काही लोक ‘हळदणकरला भेटायचंय’ म्हणत वॉर्डात घुसले. क्षणभरात त्यांनी स्वयंचलित बंदुका बाहेर काढल्या आणि हळदणकर तसेच त्यांच्या संरक्षणार्थ असलेल्या दोन्ही पोलिसांवर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात हळदणकर आणि दोन्ही पोलीस जागीच ठार झाले.त्यावेळी पोलिसांनी या घटनेची न्यायालयात माहिती दिली होती. ही घटना मुंबईतील गुन्हेगारी आणि हिंसात्मक इतिहासातील एक भयानक आणि थरारक घटना म्हणून आजही लक्षात ठेवली जाते.

सोशल मीडियावरील अश्लील कंटेंटबाबत केंद्राचा इशारा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना अश्लील सामग्रीबाबत इशारा दिला आहे. यात म्हटले आहे की कंपन्यांनी अश्लील, असभ्य, पोर्नोग्राफिक, मुलांशी संबंधित लैंगिक शोषणाचे आणि इतर प्रकारच्या बेकायदेशीर सामग्रीवर त्वरित बंदी घालावी. जर कंपन्यांनी कारवाई केली नाही, तर त्यांच्यावर खटला चालवला जाईल.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही सल्लागार सूचना सोमवारी जारी केली होती. पीटीआय वृत्तसंस्थेने मंगळवारी अहवाल जारी करून सांगितले की, सल्लागार सूचनेत इंटरनेट प्लॅटफॉर्मना आयटी कायद्याच्या संदर्भात त्यांच्या अनुपालन फ्रेमवर्कची समीक्षा करण्यास सांगितले आहे.

मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, सोशल मीडिया इंटरमीडियरीसह इतर इंटरमीडियरींना आठवण करून दिली जाते की ते आयटी कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत कायदेशीररित्या बांधील आहेत. त्यांच्या प्लॅटफॉर्मवर किंवा त्याद्वारे अपलोड, प्रकाशित, होस्ट, शेअर किंवा प्रसारित केलेल्या तृतीय-पक्ष माहितीच्या संदर्भात जबाबदारीतून सूट मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी.

पीटीआयच्या अहवालानुसार, या तरतुदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना हे सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करतात. यात असे म्हटले आहे की वापरकर्त्याने अशी कोणतीही माहिती आणि सामग्री होस्ट, प्रदर्शित, अपलोड, सुधारित, प्रकाशित, प्रसारित, संग्रहित, अद्यतनित किंवा सामायिक करू नये जी अश्लील, पोर्नोग्राफिक, बाल लैंगिक शोषणाशी संबंधित, मुलांसाठी हानिकारक किंवा बेकायदेशीर असेल.

बेतवडे गावकऱ्यांचा 'मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड' च्या विरोधात आंदोलनाचा इशारा..

विशेष प्रतिनिधी

दिवा - बेतवडे गावातील ५० टक्के कुटुंबांची 'मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड' च्या मयुर शाह या विकासकाने फसवणूक केल्यामु‌ळे ग्रामस्थ संतंप्त झाले आहेत. त्याच्या शेतीच्या जमिनी कवडीमोलाने घेऊन तेथे टोलेजंग इमारत बांधूनही बेतवडे ग्रामस्थांचा मोबदला, फ्लॅट विकासकाने ठरलेली तारिख ओलांडूनही अजून दिलेली नाही. त्यामुळे आज बेतवडे ग्रामस्थ यांनी त्यासंबंधित माहिती पत्रकारांना देऊन विकासकाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बेतवडे हे दिवा शहरातील पूर्वेकडील एक गाव आहे. तेथे काही एकर उपजाऊ जमीन 'मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड' च्या मयुर शाह या विकासकाने शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्या कडून कवडीमोलाने घेतली. त्या सर्व स्थानिकांबरोबर सागर गाला व सौरभ शाह यांनी व्यवहार केले. तेव्हा हे दोघे 'मॅरेथॉन रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड. मध्ये कार्यरत होते. या व्यक्ती वारंवार बिल्डर तर्फे हामी व आश्वासन देतो पण त्याची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी अजूनही झालेली नाही.    
तर बेतवडेच्या ग्रामस्थांनी 'मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड' चे मयुर शाह याने (बेतवडे) येथे बांधकामांच्या संदर्भात फसवणुक केल्याचा आरोप केला आहे. व्यक्तीने / कंपनीने ग्रामस्थांना (फसवणूकीचे तपशील - जसे की खोटी माहीती देणे, पैसे ठरवून व्यवहार पूर्ण न करणे, बनावट कागदपत्रे वापरणे, फ्लॅट न देणे वा त्याचे भाडे न देणे इ.) केल्याने त्या सर्वांना आर्थिक व मानसिक त्रास झालेला आहे. अशी माहिती पत्रकारांना देऊन ते रितसर पोलीस, पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना त्याबाबत निवेदना द्वारे दिली आहे. तसेच या विषयात पंधरा दिवसात कोणताही मार्ग न निघाल्यास ग्रामस्थ आणि शेतकरी आंदोलन करतील असा इशारा ही त्यावेळी दिला.

दिव्यातील ओमकार नगर नाले परिसरात नवजात मुलगी आढळल्याने खळबळ..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.२५ डिसेंबर : दिवा येथील ओमकार नगर परिसरातील नाल्यात आज सकाळी एक नवजात मुलगी टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नाल्याजवळून जाणाऱ्या नागरिकांना जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी त्या दिशेने धाव घेतली असता नाल्यात एक नवजात अर्भक असल्याचे दिसून आले.

ही बाब लक्षात येताच परिसरातील एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत थेट नाल्यात उतरून त्या चिमुकलीला बाहेर काढले. नागरिकांच्या मदतीने तात्काळ बाळाला उपचारासाठी कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने सदर नवजात मुलीची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांकडून आवश्यक उपचार सुरू आहेत.

या अमानुष कृत्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून नवजात बाळाला नाल्यात टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

स्थानिक नागरिकांचे स्पष्ट मत – स्वप्नील मळमंडेंनाच तिकीट द्यावे | विशेष बातमी

संदिप कसालकर
अंधेरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा ऐकू येत आहे — “ज्याने शून्यातून संघटना उभी केली, त्यालाच संधी मिळाली पाहिजे.”
ही भूमिका कोणत्याही पक्षाच्या वतीने मांडलेली नसून, स्वतः स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि मतदार व्यक्त करत आहेत.

स्थानिकांचे म्हणणे आहे की 2022 नंतर जेव्हा परिसरात शिवसेनेची शाखा नव्याने उभी राहत होती, तेव्हा स्वप्नील मळमंडे यांनी एकट्याने सुरुवात करून आज मजबूत संघटनात्मक रचना उभी केली. घराघरात जाऊन संपर्क, लोकांच्या अडचणी ऐकून घेणे, सरकारी योजनांचे फॉर्म भरून देणे, महिला सक्षमीकरणाचे उपक्रम राबवणे — ही कामे निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून नव्हे, तर रोजच्या कामातून झाली, असे नागरिक सांगतात.

महिला लाभार्थ्यांना घरघंटी, शिलाई मशीन मिळवून देणे, पोलीस वसाहतीतील रेशनकार्ड व आरोग्य प्रश्न मार्गी लावणे, पाण्याची अडचण तातडीने सोडवणे, रस्ते, गटार, ड्रेनेज यासाठी पाठपुरावा — “ही कामे आम्ही प्रत्यक्ष अनुभवली आहेत,” असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

बूथ पातळीवर पुरुष व महिला गटप्रमुख, शिवदूतांचे नेटवर्क आणि थेट संपर्क यामुळे “आमच्यापर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता” अशी ओळख स्वप्नील मळमंडे यांनी निर्माण केली आहे. त्यामुळे आज येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, “ज्याने संघटना बांधली, मतदार जोडले आणि परिसरासाठी झटला, त्यालाच उमेदवारी मिळावी,” अशी ठाम भूमिका स्थानिक नागरिक मांडत आहेत.

स्थानिकांचे हेही म्हणणे आहे की,
“आम्हाला मोठी भाषणे नकोत, आमच्यासोबत रस्त्यावर उभा राहणारा नगरसेवक हवा आहे.”
आणि याच निकषावर स्वप्नील मळमंडेंचे नाव अग्रक्रमावर असल्याचे नागरिक स्पष्टपणे बोलून दाखवत आहेत.

म्हणून ही मागणी कोणत्याही प्रचारातून नव्हे, तर स्थानिक जनतेच्या अनुभवातून पुढे येत आहे —
अंधेरीतून उमेदवारी द्यायचीच असेल, तर ती स्वप्नील मळमंडेंनाच द्यावी, असे स्थानिकांचे ठाम मत आहे.

'इसरो' ने प्रक्षेपित केला सर्वांत वजनदार उपग्रह..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
श्रीहरीकोटा, दि. २४ : इसरो ने आज हेवी-लिफ्ट लाँच व्हेईकल मार्क-३ (LVM3-M6) प्रक्षेपित केला. सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरून इसरोने अमेरिकेच्या ६ हजार १०० किलो वजनाच्या 'ब्लूबर्ड ब्लॉक -२' या उपग्रहाचे पृथ्वीच्या निम्न कक्षेत (लोअर अर्थ ऑर्बिट) यशस्वी प्रक्षेपण केले. भारतीय भूमीत भारतीय प्रक्षेपकाने प्रक्षेपित केलेला हा सर्वात वजनदार उपग्रह आहे. ५२ दिवसांच्या कालावधीत हे पहिलेच सलग LVM3 प्रक्षेपण मोहिमा देखील आहेत. हा जगातील सर्वात मोठा व्यावसायिक सॅटेलाईट आहे, जो अंतराळातून थेट सामान्य स्मार्टफोनला हाय-स्पीड ब्रॉडबँड देईल. LVM3 ची ही सहावी ऑपरेशनल मिशन आहे आणि आजपर्यंतची सर्वात जड पेलोड आहे.

भारताच्या हेवी-लिफ्ट रॉकेट LVM3 ने आज सकाळी अमेरिकेच्या कम्युनिकेशन सॅटेलाईट – ब्लूबर्ड ब्लॉक-२ ला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. ६१०० किलो वजनासह, हे रॉकेटने उचललेले सर्वात वजनदार पेलोड होते ज्याने त्याचे सहावे ऑपरेशनल फ्लाईट आणि तिसरे समर्पित व्यावसायिक मिशन पूर्ण केले. इसरोचे अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणाले की LVM3 रॉकेटने नियोजित ५२० किमी कक्षेच्या तुलनेत ५१८.५ किमीची कक्षा गाठली. इसरोने सर्वात जड उपग्रह ब्लूबर्ड ब्लॉक-२ ला LVM3 रॉकेटवर प्रक्षेपित केले

इसरोची व्यावसायिक शाखा 'न्यू स्पेस इंडिया लिमिटेड'ने अमेरिकन कंपनी 'एएसटी स्पेस मोबाइल' सोबत करार केला होता. प्रक्षेपणानंतर १५ मिनिटांनंतर हा उपग्रह रॉकेटपासून वेगळा केला जाईल आणि हा उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सुमारे ६०० किलोमीटर अंतरावर स्थापित केला जाईल.