BREAKING NEWS
latest

रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई - नाशिक मधील भोंदूबाबा ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने जोर धरत होती. अखेर या प्रकरणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संध्याकाळी भेट घेतली होती. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.

तदनंतर रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीस दाखल झाल्या होत्या. त्या नंतर या सर्व पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे कडे सुपूर्द केला आहे.

सुमित कंपनीने सफाई कामगारांचे दोन महिन्याचे वेतन रखडवल्याने कामगार संघटनेचे काम बंद आंदोलन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - कल्याण:डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत सुमित कंपनीला कचरा उचलण्याचे काम दिलेले आहे. परंतु या कंपनीने सफाई कामगारांचे गेले दोन महिन्यापासून पगार थकविले आहे. याकरता बुधवार १८ तारखेला डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा येथे कामगारांनी पुंडलिकशेठ म्हात्रे कामगार संघटनेने काम बंद आंदोलन केले. 

यादरम्यान शहरात कचरा सकाळी उचलला गेला नाही. त्यामुळे कामगारवर्ग जमल्यानंतर युवा नेते भाजपा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना एक इशारा देऊन आजचं पगार देण्याचे सांगितले, अन्यथा उद्या पुन्हा काम बंद करू, असा इशारा दिला आहे. यावेळी घनकचरा व्यवसस्थापण विभागाचे उप-आयुक्त रामदास कोकरे हजर होते. त्यांनी लवकरात लवकर कामगारांचे पगार द्यावेत असे ठेकेदाराला सुनावले.

डॉ.मनिलाल शिंपी यांना 'महाराष्ट्र टॉप १० न्यूज' तर्फे "समाजभूषण" पुरस्कार जाहीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - आजचा 'महाराष्ट्र टॉप १० न्यूज' चॅनेल चा वर्धापन दिनाच्या निमित्ताने, मानवसेवा, समाजसेवा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील समाजसेवकांचा विशेष पुरस्कार सोहळा दिनाक २२ मार्च रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा येथे आयोजित करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र राज्य 'मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप'चे प्रमुख व रस्ता सुरक्षा अभियान चे विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) आदिवासी भागातील सातपुड्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा परिसरातील परिवर्धा येथील श्री. रतिलाल रामदास शिंपी व लीलाबाई रतिलाल शिंपी यांचे सुपुत्र, डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी हल्ली मुक्काम: आंबिवली (कल्याण)  यांचाकडून सुरू असलेल्या समाजसेवेचा व मानवसेवेचा कार्याची दखल घेऊन आजचा 'महाराष्ट्र टॉप १० न्यूज' चॅनेल चे संपादक प्रशांत/प्रसाद गणपत मोरे यांनी घेतली असून दिनाक २२ मार्च रोजी रायगड जिल्ह्यतील रोहा येथे चॅनलच्या वर्धापन दिनाचा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉ. मणिलाल रतिलाल शिंपी यांना "महाराष्ट्र समाज भूषण" पुरस्कार देण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

डॉ. मनिलाल शिंपी यांच्या कार्याचा गौरव आमच्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची बातमी आहे, त्यांचा संकल्पनेनुसार आम्ही खऱ्या अर्थाने समाजसेवा करीत आहोत अशी माहिती 'दैनिक स्वराज्य तोरण' चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील व 'चंद्रानंद कृषी पणन' संस्थेचे अध्यक्ष डॉ. यशवंत अनंत म्हात्रे, समाजसेवक उद्योजक डॉ. रामचंद्र देसले, भाजपा व्यापारी असोसिएशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष डॉ.यशवंत(भाऊ) सोरे, समाज सेवक उद्योजक डॉ.किशोर अढळकर, यांनी विशेष माहिती दिली. राजस्थान नामदेव समाजाचे सचिव नटवर वर्मा, कल्याण शिंपी आमचे सचिव, अरविंद शिंपी, प्रविण भांडारकर, गणेश साळवे, किशोर बागुल, मनोहर सोनवणे, पोलिस पाटील सोमनाथ ठाकरे, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ. दिनेश ठक्कर, रोटी डे ग्रुप चे नितील चंदेया, निलेश शहा, महिला फाऊंडेशनचा रश्मी शर्मा, 'लेडीज एक्सप्रेस' च्या मधुबेन ठक्कर, इच्छामणी भजनी मंडळाच्या अध्यक्षा, खजिनदार सचिव, परिवर्धा येथील आरोग्य सेवक, प्रसिद्ध डॉक्टर किशोर आमोदकर यांच्यासह सर्व मित्र मंडळी कडून कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

गुढी पाडव्यानिमित्त डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेत एक खास आकर्षण ठरलेलेली दीडशे फुटांची महाकाय गुढी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि.१९ मार्च – डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेचे यंदाचे २८ वे वर्ष होते. आपल्या हिंदू संस्कृतीच्या नव्या वर्षाची सुरुवात मंगलमय व्हावी आणि तरुण पिढीला आपल्या भारतीय संस्कृतीशी नाते टिकवून ठेवावे या उद्देशाने ही संकल्पना सांस्कृतिक डोंबिवली शहरातून श्री गणेश मंदिर संस्थानाच्या माध्यमातून सुरु झाली आणि याचा एक डोंबिवलीकर म्हणून कायमच अभिमान वाटतो, असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले. या संकल्पनेचे श्रेय आबासाहेब पटवारी आणि सुधीर जोगळेकर या भाजपा संघ परिवारातील डोंबिवलीकरांना असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. 
या वर्षीचे अजून एक खास आकर्षण ठरले ते म्हणजे नेहरू मैदानात उभारलेली महाकाय दीडशे फुटांची गुढी. विशाल हिंदुत्व आणि भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे प्रतीक म्हणून ही महाकाय गुढी डौलाने उभारल्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

त्याच बरोबर डोंबिवलीतील शोभायात्रेत यावर्षी दोन ठळक गोष्टींनी लोकांचे लक्ष वेधले. 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताचे शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवी १५० वे वर्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी १०० वे वर्ष यावर आधारित डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराने २ चित्ररथ साकारले होते. हे चित्ररथ यंदाच्या नववर्ष स्वागत यात्रेचे विशेष आकर्षण ठरले. यामुळे यंदाच्या स्वागतयात्रेत डोंबिवलीच्या सांस्कृतिक संचिता सोबतच राष्ट्रीयत्वाच्या विचारधारेचेही दर्शन घडले. हा दुर्मिळ असा दुग्धशर्करा योग आल्याने यंदा डोंबिवलीकर परिवाराने याच राष्ट्रीयत्वाच्या विषयाला अनुसरून चित्ररथ साकारले. 
'वंदे मातरम'चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि रा.स्व संघाच्या पंचसूत्रीवर आधारित चित्ररथाच्या संकल्पनेला अपेक्षेनुसार डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माध्यमांना दिली.

तसेच यंदाच्या वर्षी देशभक्तीची अनेक रूपं अशा आशयाची संकल्पना राबवली त्यास डोंबिवलीकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. "क्रांतिकारी देश सेवक" या संकल्पनेवर आधारित वेशभूषा स्पर्धा झाली. त्यामध्ये ५ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ७५ वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत आबालवृद्धांनी सहभाग घेतला. विजेत्यास ₹ २५,००० रुपयांची रोख रक्कम देण्यात आली तर उपविजेत्यास ₹ १५,००० त्याचबरोबर अन्य पारितोषिके देण्यात आली.

रिंगरूट बाधित शेतकऱ्यांना मोबदला न देता खोदकाम व भरणी टाकत असल्याने कडोंमपा विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत रिंगरूट बनवला जात असून त्या विकासकामांसाठी स्थानिक भूमिपुत्र यांच्या जागेतून तो बनवला जातं असून सदर रिंगरूट बाधित शेतकऱ्यांना  त्या बाधित जागेचा मोबदला मिळावा म्हणुन उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून त्यावर रिंगरूट बाधित शेतकऱ्यांनी अपील सुद्धा केले आहे.


२०२३ च्या अखेरीस उच्च न्यायालयात अपील केलेली असताना की रिंगरूट बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणुन काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मध्यस्थी करून त्यांनी सुद्धा सांगितले की रिंगरूट बाधित शेतकऱ्यांनी ज्यांनी तक्रारी केल्या आहेत त्यांना त्याचा काहीतरी मोबदला मिळेल याचा आम्ही पाठपुरावा करू. पण तसं काहीच न होता तीन ठिकाणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकारी आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर यांनी त्या जागेत घुसून खोदकाम करत भरणी टाकत असल्याचे बघून ते आम्हांस खटकत आहे की बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता व मोबदला न मिळता माननीय उच्चं न्यायालयाच्या आदेशाचं भंग करत अवमान करीत असल्याने आम्ही पुन्हा न्यायालयात व पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जातं असल्याचे दयानंद म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

यावेळी या बाधित शेतकऱ्यांमध्ये राजू काथोड म्हात्रे, दयानंद अनंत म्हात्रे, गोपाळ गोविंद भोईर, हेमकांत बाबू म्हात्रे, जयवंत मुकुंद जोशी, हरी दत्तू म्हात्रे, नाना गंगाराम पाटील, सुनील राजाराम खारे हे या एल्गारात उपस्थित होते.


५९ अनुसूचित जातींसाठी ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरणाची आमदार अमित गोरखे यांची सरकार कडे मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई , दि.१६ : अनुसूचित जातींमधील सर्व घटकांना समान न्याय, प्रतिनिधित्व आणि विकासाच्या संधी मिळाव्यात, यासाठी ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरण तातडीने लागू करण्यात यावे, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी केली आहे. अनुसूचित जातींमधील ५९ विविध जातींना त्यांच्या लोकसंख्या, सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीनुसार योग्य संधी मिळण्यासाठी हे वर्गीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘जस्टीस अनंत बदर समिती’ ने उपवर्गीकरणाबाबत जो अभ्यास केला आहे, त्याचा अहवाल आता तातडीने शासनाकडे सादर करण्यात यावा, अशी महत्त्वाची मागणी देखील आमदार अमित गोरखे यांनी यावेळी केली आहे. 
आमदार अमित गोरखे यांनी प्रतीकात्मक आंदोलन करून सरकारचे वेधले लक्ष

अनोख्या पद्धतीने आंदोलन
या मागणीसाठी आज आमदार अमित गोरखे यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. ५९ अनुसूचित जातींच्या नावांचा प्रतीकात्मक हार परिधान करून त्यांनी ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरणाची मागणी अधोरेखित केली. या आंदोलनातून अनुसूचित जातींमधील सर्व घटकांना समान संधी देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

मागास घटकांना समान न्याय पाहिजे 
यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, अनुसूचित जातींमधील काही घटकांना आरक्षण व शासकीय योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळत असताना काही जाती अजूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. या पार्श्वभूमीवर अनुसूचित जातींच्या अंतर्गत ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरण केल्यास वंचित आणि मागास घटकांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळू शकतो.

'अ-ब-क-ड’ वर्गीकरण अत्यंत महत्त्वाचे
 
सत्तेत असतानाही समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवणे ही आमची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे, असेही आमदार अमित गोरखे यांनी यावेळी सांगितले. सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि अनुसूचित जातींमधील सर्व घटकांचा समतोल विकास साधण्यासाठी ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरण अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास आमदार अमित गोरखे यांनी यावेळी व्यक्त केला. या वर्गीकरणामुळे दीर्घकाळापासून वंचित राहिलेल्या घटकांना शिक्षण, नोकरी आणि विविध शासकीय योजनांमध्ये न्याय्य प्रतिनिधित्व मिळेल. तसेच समाजातील असमानता कमी होऊन अनुसूचित जातींतील सर्व घटक मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल. राज्य शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि अनुसूचित जातींमधील ‘अ-ब-क-ड’ वर्गीकरण लागू करून सामाजिक न्यायाच्या दिशेने ठोस पाऊल उचलावे असे आमदार अमित गोरखे म्हणाले 

यापूर्वीही त्यांनी 'अ, ब, क, ड' अशी अक्षरे असलेला शर्ट परिधान करून विधानसभेत आणि बाहेरही या विषयाचा पाठपुरावा केला होता. आजच्या या कृतीतून त्यांनी उपवर्गीकरणाचा मुद्दा किती संवेदनशील आणि न्याय्य आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. आमदार गोरखे यांच्या या आंदोलनामुळे उपवर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्वरित हे वर्गीकरण जाहीर करावे असे आमदार गोरखे यांनी मागणी केली आहे.

दिव्यातील 'रोटरी क्लब'तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवा : 'रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे' यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून काल सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर दिव्यातील हनुमान मंदिर, दातिवली गाव येथे पार पडले. सामाजिक बांधिलकी जपत अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून या उपक्रमाला प्रतिसाद दिला. या शिबिरात एकूण २५ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन रोटरी क्लबचे अध्यक्ष, किशोर पाटील, प्रकल्प प्रमुख, आदित्य पाटील आणि सचिव स्वप्नील गायकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. समाजहिताच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून अशा उपक्रमांमुळे समाजात सेवा व सहकार्याची भावना अधिक बळकट होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.