BREAKING NEWS
latest

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई, दि.१४ : प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आणि त्याचे महत्व लक्षात घेऊन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता चार दिवसीय कार्यशाळा हा नवा उपक्रम राबवला आहे. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असेल. याचबरोबर महाराष्ट्र राज्य रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात ‘एआय फॉर न्यूज’ या विषयाचा चार महिन्यांचा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचना आली आहे. याबाबत सकारात्मक विचार करू असे कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन नेता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

'रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ' आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात ४ दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. समारोह कार्यक्रमात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, एआय तज्ज्ञ किशोर जशनानी, उपकुलसचिव राजेंद्र तलवारे, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दिपक भातुसे, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे प्रशिक्षक लोमेश नारखेडे, सल्लागार गजानन हेगडे, वरिष्ठ सल्लागार आशिष श्रीवास्तव, प्रशासकीय सहाय्यक ऋषी देठे, शॉर्ट टर्म कोर्सेस चे शुभम शेंडे, श्रावणी कोचरे, भूषण पवार तसेच प्रिंट,इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते.

११ ते १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान मंत्रालयात आयोजित केलेल्या या कार्यशाळेत एआय साधनांचा पत्रकारितेसाठी वापर कसा करावा, वृत्ताची पडताळणी, माहिती शोधण्याची गती, तसेच डिजिटल कामकाजातील अचूकता आणि सुलभता याविषयी पत्रकारांना मार्गदर्शन मिळाले. या प्रशिक्षणाला पत्रकारांकडून मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता हा उपक्रम राज्यभर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन घोषणेनुसार जिल्हा व तालुका स्तरावर काम करणाऱ्या पत्रकारांना आधुनिक एआय साधनांची ओळख आणि त्यांचा वापर प्रत्यक्ष शिकण्याची मोफत संधी उपलब्ध होणार आहे.

या निर्णयाबद्दल बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, “आज प्रत्येक पत्रकारावर बातमीच्या वेगासोबतच तिची अचूकता टिकवण्याची जबाबदारी वाढली आहे. अशा वेळी एआय ही केवळ तांत्रिक सुविधा नाही, तर कामाला नवी धार देणारे साधन आहे. राज्यातील प्रत्येक पत्रकार अधिक सक्षम व्हावा, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या माध्यमातून पत्रकारांद्वारे जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील आणि हेच या उपक्रमाचे खरे यश ठरेल”

चार दिवसीय कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ किशोर जशनानी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरताना कोणकोणते प्रॉम्प्ट द्यायचे, चॅट जीपीटीला कोणकोणते पर्याय आहेत, त्याचप्रमाणे पत्रकारितेसाठी इतर कोणते सहायक टूल्स आहेत. फोटोवरून बातमी कशी बनवायची, फोटोवरून व्हिडिओ कसा बनवायचा, न्युज रिपोर्ट कसा बनवायचा. प्रिंट इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडियासाठी बातमी कशी वापरायची ? त्याचप्रमाणे चॅट पीडीएफ चा वापर कसा करायचा याची माहिती त्यांनी दिली.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या की, ‘एआय’ फॉर न्यूज या विषयाचा डिप्लोमा सुरू करण्याची सूचना आली आहे याबाबत सकारात्मक विचार करू. कृत्रिम बुद्धिमत्ता ही कार्यशाळा सर्व पत्रकारांना त्यांच्या दैनदिन कामात अत्यंत उपयुक्त ठरेल. पत्रकारांनी त्यांना या कार्यशाळेबद्दल चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. या कार्यशाळेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

एआय पत्रकारिता कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या सर्व पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या वेळेला पत्रकार दीपक कैतके, पत्रकार संजय जोग, पत्रकार क्लारा लुईस यांनी चार  दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेविषयी मत व्यक्त केले. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे आभार मानले. सरचिटणीस दीपक भातुसे यांनी सूत्र संचालन केले. कार्यकारिणीचे सदस्य खंडूराज गायकवाड यांनी कार्यक्रमाचे समन्वय केले.

बिहारमध्ये भाजपला मोठे यश, पुन्हा येणार एनडीए (NDA) सरकार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
पाटना, दि. १४ : आज जाहीर झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप आणि एनडीए आघाडीने प्रचंड यश मिळवले असून बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बिहार विधानसभेच्या २४३ जागांपैकी एनडीए आघाडीने तब्बल २०० हून अधिक जागा जिंकून “डबल सेंच्युरी” मारली. या निकालामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा *नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार* स्थापन होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात राजद आघाडी आघाडीवर असल्याचे चित्र होते, मात्र दुपारनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. भाजपने सर्वाधिक जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला. महागठबंधनला मोठा धक्का बसला असून त्यांची दाणादाण झाली आहे. या विजयामध्ये महाराष्ट्र भाजपमधील नेते विनोद तावडे यांच्या रणनितीचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पक्षनिहाय मतसंख्या
भाजप (BJP) - 128
जेडीयू (JDU) - 52
लोक जनशक्ती पार्टी (LJP) - 22
इतर एनडीए सहयोगी - 5
राजद (RJD) - 25
काँग्रेस (INC) - 7
डावे पक्ष (CPI, CPI(M), CPI(ML)) - 3
इतर / अपक्ष - 1
एकूण - 243

या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच एनडीएतील प्रमुख नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला होता. त्याचा परिणाम निकालात स्पष्टपणे दिसून आला. मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएने स्थानिक सत्ता-विरोधी लाटेला तोंड देत प्रचंड विजय मिळवला. पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सुशासन आणि विकास यांचीच जनतेने निवड केली आहे”. तर गृहमंत्री अमित शाह यांनी हा विजय बिहारच्या जनतेचा विश्वास असल्याचे म्हटले.

महागठबंधनातील राजद, काँग्रेस आणि डावे पक्ष यांना अपेक्षित यश मिळाले नाही. तेजस्वी यादव आणि त्यांच्या आघाडीला मोठा धक्का बसला असून बिहारमध्ये एनडीएचे वर्चस्व अधिक बळकट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा प्रचंड विजय हा सुशासन, विकास आणि जनहित आणि सामाजिक न्यायाच्या भावनेचा विजय असल्याचे म्हटले. एक्सवरील पोस्टच्या मालिकेत मोदींनी भाजपच्या आघाडीतील भागीदार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, एलजेपी-आरव्हीचे प्रमुख चिराग पासवान, एचएएम नेते जीतन राम मांझी आणि आरएलएमचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांचे अभिनंदन केले.

"२०२५ च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय मिळवून देणारे बिहारमधील माझ्या कुटुंबातील सदस्यांचे मनापासून आभार,” असे मोदी म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, जनतेचा जबरदस्त जनादेश एनडीएला लोकांची सेवा करण्यास आणि बिहारसाठी नवीन संकल्पाने काम करण्यास सक्षम करेल.

भाजप, जेडी(यू) आणि इतर पक्षांचा समावेश असलेला एनडीए २४३ सदस्यीय सभागृहात २०४ जागांवर आघाडी घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजयाच्या मार्गावर आहे. राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या विरोधी महाआघाडीला ३३ जागांवर आघाडी मिळवता आली, जे २०२० च्या निवडणुकीत मिळालेल्या जागांपेक्षा ८१ जागा कमी आहेत. “एनडीएने राज्याचा सर्वांगीण विकास सुनिश्चित केला आहे. आमचा ट्रॅक रेकॉर्ड आणि राज्याला नवीन उंचीवर नेण्याचे आमचे स्वप्न पाहून जनतेने आम्हाला प्रचंड बहुमत दिले आहे,” असे मोदी म्हणाले.

“या शानदार विजयाबद्दल मी मुख्यमंत्री नितीश कुमार जी आणि आमच्या एनडीए कुटुंबातील सदस्य चिराग पासवान जी, जीतन राम मांझी जी आणि उपेंद्र कुशवाह जी यांचे मनापासून अभिनंदन करतो,” असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी अथक परिश्रम घेतलेल्या आणि सत्ताधारी आघाडीचा विकास अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक एनडीए कार्यकर्त्यांचे आभार मानले. “मी त्यांचे मनापासून कौतुक करतो,” असे ते म्हणाले. “येणाऱ्या काळात, आम्ही बिहारच्या विकासासाठी सक्रियपणे काम करू, येथील पायाभूत सुविधांना आणि राज्याच्या संस्कृतीला एक नवीन ओळख देऊ. येथील युवा शक्ती आणि महिला शक्तीला समृद्ध जीवनासाठी भरपूर संधी मिळतील याची आम्ही खात्री करू,” असे मोदी म्हणाले.

१४ नोव्हेंबर २०२५ च्या निकालाने बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे वर्चस्व सिद्ध झाले. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार आता स्थापन होणार आहे. हा विजय केवळ राजकीय नाही तर जनतेच्या विश्वासाचा पुरावा मानला जात आहे.

सार्वत्रिक निवडणुकीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांची संख्या १२२..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 'सार्वत्रिक निवडणूक सन २०२५' मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्याचा कार्यक्रम आज सकाळी कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, सहाय्यक संचालक नगर रचना, महापालिका सचिव किशोर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांची संख्या १२२ इतकी आहे. ही निवडणूक बहु सदस्य प्रभाग पद्धतीनुसार होणार असून त्यात एकूण प्रभागांची संख्या ३१ असून तीन जागांचे ०२ प्रभाग व चार जागांचे २९ प्रभाग आहेत.
१२२ जागापैकी १२ जागा अनुसूचित जाती, ०३ जागा अनुसूचित जमाती, ३२ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ७५ जागा सर्वसाधारण असून त्यापैकी ६१ जागा महिलांसाठी आरक्षित आहे. या महिलांसाठी आरक्षित जागांपैकी ०६ जागा अनुसूचित जाती (महिला), ०२ जागा अनुसूचित जमाती (महिला), १६ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि ३७ सर्वसाधारण (महिला) जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.
"आरक्षण सोडत बाबत १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रारूपावर होणार नागरिकांच्या हरकती.."

सदर आरक्षण सोडतीचे तपशील राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेकरिता पाठविण्यात येणार आहेत. आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षण सोडतीचे प्रारूप (ड्राफ्ट) प्रसिद्ध केले जाणार आहे.
नागरिकांना १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रारूपावर होणार हरकती व सूचना निवडणूक कार्यालय, मुख्यालय येथे सादर करता येतील अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्ब स्फोटात ८ ठार अनेक जखमी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली : देशात निवडणूक वातावरण चांगलेच तापले असताना राजधानी दिल्ली सोमवारी सायंकाळी भीषण स्फोटाने हादरली. दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १. बाहेर पार्क केलेल्या कारमध्ये झालेल्या शक्तिशाली बॉम्ब स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. जखमींना तातडीने एल.एन.जेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोट स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता झाला. स्फोटानंतर परिसरात भीषण आग लागली, आसपास उभ्या असलेल्या काही वाहनांना देखील आग लागल्याने काही क्षणांतच भगदड माजली. परिसरात धुराचे लोट पसरले आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.

*राजधानी दिल्लीत "हाय अलर्ट.."*

घटनास्थळी तातडीने दिल्ली पोलीस, फॉरेन्सिक तज्ज्ञ, तसेच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एन एस जी) यांचे पथक दाखल झाले असून तपास सुरू आहे. परिसर सील करण्यात आला आहे. या घटनेनंतर दिल्लीसह संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ‘हाय अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांकडून प्राथमिक तपासात स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारण्यात आलेली नाही. घटनास्थळावरून काही संशयास्पद अवशेष आणि सीसीटीव्ही फूटेज जप्त करण्यात आले आहेत.

या घटनेने पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. “स्फोट अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता. सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. दोषींना वाचू दिले जाणार नाही,” असे दिल्ली पोलिस आयुक्तांनी सांगितले. या भीषण घटनेमुळे दिल्ली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे सावट कायम आहे.

डोंबिवलीतील 'अनिल आय हॉस्पिटल' तर्फे १६ नोव्हेंबर रोजी सर्वात मोठ्या 'व्हिजन वॉक' चे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवलीतील 'अनिल आय हॉस्पिटल', 'महाराष्ट्र ऑपथेलमोलॉजिस्ट सोसायटी' (MOS), 'डोंबिवलीकर ग्रुप', आणि 'इंडियन मेडिकल असोसिएशन' (IMA)  डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने “नेत्ररक्षा - डायबेटीस आय अवेअरनेस वॉक” ही भव्य जनजागृती मोहीम रविवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या नेत्र जनजागृती मोहिमेत डोंबिवलीतील 'अनिल आय हॉस्पिटल' तर्फे प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर नेत्रजागृतीसाठी एक मोठी मोहीम राबवली जात असून, या माध्यमातून नागरिकांना मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या आजारांबद्दल आणि अंधत्व टाळण्यासाठी वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देण्याचा हेतू आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय आमदार श्री. रवींद्र चव्हाण, (अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश) असतील. सुमारे २,००० पेक्षा अधिक नागरिक या जनजागृती वॉकमध्ये सहभागी होणार असून. यात कॉलेज विद्यार्थी, रोटरी व रोटरॅक्ट क्लबस्, विविध सामाजिक व धार्मिक संस्था, डायबेटॉलॉजिस्ट, डॉक्टर तसेच डोंबिवलीतील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र ऑपथेलमोलॉजिस्ट सोसायटी' (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. 
रॅलीची सुरुवात सकाळी ७.०० वाजता गणेश मंदिर रोड येथून होणार असून, सकाळी ९.०० वाजता त्याच ठिकाणी समारोप करण्यात येईल. समारोपानंतर माननीय श्री. रवींद्र चव्हाण आणि डॉ. अनघा हेरूर संचालक 'अनिल आय हॉस्पिटल' तसेच अध्यक्षा (MOS) यांचे विशेष मार्गदर्शन होईल.

या निमित्ताने डॉ. अनघा हेरूर यांनी नागरिकांना आवाहन केले की, “मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे विकार वेळेवर तपासणी केल्यास टाळता येऊ शकतात. चला, आपण सगळे मिळून डोंबिवलीला डायबेटीसजन्य अंधत्वमुक्त बनवूया.”

'अनिल आय हॉस्पिटल' तर्फे सर्व नागरिक, सामाजिक संस्था, वरिष्ठ नागरिक, कॉर्पोरेट्स आणि युवकांना या मोहिमेत सहभागी होऊन “वेळीच नेत्रतपासणी करा आणि दृष्टी सुरक्षित ठेवा” हा संदेश समाजात पोहोचवण्याचे आवाहन डॉ. अनघा हेरूर यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

* श्री. भूषण फडतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) 'अनिल आय हॉस्पिटल'
संपर्क मोबाईल: ९८२१८८७७१६

* श्री. जय चौधरी, मार्केटिंग मॅनेजर  'अनिल आय हॉस्पिटल'
संपर्क मोबाईल: ८१०८८८१५५५

भाजप चे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे शिंदे सेनेत दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत आज कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील भाजपाचे माजी नगरसेवक विकास गजानन म्हात्रे, भाजपच्या माजी नगरसेविका कविता विकास म्हात्रे आणि माजी नगरसेवक नंदू धुळे - मालवणकर यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

राज्यात शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या जनहितकारी, विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कामकाजामुळे जनतेत प्रचंड उत्साह निर्माण झाला असून, या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन विविध पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेशी जोडले जात आहेत.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “विकासाला दिलेली चालना आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट काम करण्याच्या दृष्टिकोनामुळे आज सर्वच स्तरातून शिवसेनेला भक्कम पाठिंबा मिळत आहे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष म्हणून प्रत्येक शिवसैनिकाच्या मागे ठामपणे उभी राहील,” असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

भिवंडी उबाठा संपर्क प्रमुख साईनाथ तरे, डोंबिवली भोपरगाव उबाठा विभागप्रमुख दिलखुश माळी, युवासेना समन्वयक पंकज माळी, शाखा प्रमुख सागर पाटील, विजय साळवी, संदीप रपसे, तसेच गांधीनगर विभागातील भाजपच्या अक्षदा भोसले, भाविक म्हात्रे, राजेंद्र खरात, अंकुश पिंजळकर, अमोल पाटील, प्रकाश मोरे, विजय धुरे, प्रीती आचरेकर, उर्मिला नाईक, रवींद्र लोट, मधू करंजे, स्वप्नील सोलिम आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, महेश गायकवाड यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेचे कट्टर शिंदे गटाचे समर्थक दीपेश म्हात्रे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) सचिव संतोष केणे यांचा भाजप मध्ये पक्ष प्रवेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : एकेकाळचे कट्टर शिंदे समर्थक आणि आताचे उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, तसेच काँग्रेस (आय) चे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी नगरसेवक संतोष केणे यांच्यासह अन्य माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत डोंबिवली जिमखाना येथे भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. हे पक्ष प्रवेश उद्धवसेना आणि काँग्रेसला धक्का देणारे असले, तरी उद्धवसेनेत येण्यापूर्वी शिंदेसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या दीपेश म्हात्रेना आपल्या गळाला लावून एकप्रकारे भाजपने केडीएमसी निवडणुकीआधी शिंदेसेनेलाही शह दिल्याच्या चर्चेला उधान आले आहे.
डोंबिवलीतील जिमखाना येथे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आ. रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आ. सुलभा गायकवाड, आ. नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नंदू परब, राहुल दामले, मंदार हळबे, शशिकांत कांबळे, पूर्वमंडल अध्यक्ष मितेश पेणकर, पश्चिम मंडलाचे माजी अध्यक्ष समीर चिटणीस यांसह भाजपमधील अन्य मान्यवर तसेच महिला कार्यकर्त्या मनीषा राणे, वर्षा परमार, पूनम पाटील व असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
             
भाजपात पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये उद्धवसेनेचे माजी नगरसेवक व सभापती दीपेश म्हात्रे यांच्यासह त्यांचे बंधू जयेश म्हात्रे, मातोश्री रत्नप्रभा म्हात्रे, काँग्रेस (आय) चे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी नगरसेवक संतोष केणे, संतोष तरे, अनंता गायकवाड, रामभाऊ ओव्हळ, देवानंद गायकवाड, प्रधान पाटील, माजी नगरसेविका वैशाली केणे, अनिता कर्पे, पूजा म्हात्रे, उद्योगपती संजय गायकवाड यांनी प्रवेश केला.


केडीएमसी पालिकेला भाजपच महापौर देणार : रवींद्र चव्हाण

भाजपावर विश्वास दाखवून ज्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. केडीएमसीच्या निवडणुकीत भाजपच महापौर देईल, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार असून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विकासाच्या दिशेने नेणारे पारदर्शक सरकार कोणी देऊ शकत असेल तर ते भाजप आहे. केडीएमसीतील आणखी काही नगरसेवक येत्या काही दिवसांत भाजपात प्रवेश करणार असल्याची माहितीदेखील चव्हाण यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांना दिली.