BREAKING NEWS
latest

एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशी अहवालात टेकऑफनंतर दोन्ही इंजिन बंद असल्याचा धक्कादायक खुलासा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

अहमदाबाद : अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान अपघाताच्या एएआयबीच्या चौकशी अहवालात कॉकपिटमधील पायलटचा संवाद समोर आला आहे. कॉकपिट व्हॉयस रिकॉर्डर (सीव्हीआर) नुसार, पायलट सुमीत सभरवाल याने दुसरा पायलट कुंदर याला विचारले, तू इंजिन का बंद केले? अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. अपघाताच्या महिन्याभरानंतर आलेल्या या चौकशी अहवालात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) ने हा अहवाल दिला आहे. त्यानुसार, टेकऑफ झाल्यानंतर विमानाचे दोन्ही इंजिन काही सेकंदात बंद पडल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच विमानाचा अपघात झाल्याचे म्हटले आहे. हा अहवाल प्राथमिक आहे. सध्या अपघाताची सविस्तर चौकशी सुरू आहे, असेही तपास अहवालात म्हटले आहे.

एएआयबी ने १५ पानांचा अहवाल दिला आहे. त्यात म्हटले आहे की, विमानाने सकाळी ०८:०८ वाजता १८० नॉट्सची कमाल इंडिकेटेड एअरस्पीड घेतली होती. त्यानंतर लगेचच, इंजिन-१ आणि इंजिन-२ चे इंधन कट-ऑफ स्विच (जे इंजिनांना इंधन पाठवतात) ते ‘रन’ वरून ‘कटऑफ’ परिस्थितीत गेले. फक्त एका सेंकदात हे घडले. त्यामुळे इंजिनमध्ये इंधन येणे बंद झाले. त्यानंतर दोन्ही इंजिन एन१ व एन२ रोटेशन स्पीड वेगाने निकामी झाले.

अपघातात २६० जणांचा मृत्यू

एअर इंडियाच्या विमानाचा १२ जून रोजी अपघात झाला होता. या विमानाने अहमदाबाद विमानतळावरुन लंडन जाण्यासाठी टेकऑफ घेतले होते. विमान टेकऑफ घेतल्यानंतर काही सेंकदात मेडिकल कॉलेजच्या हॉस्टल परिसरात क्रॅश झाले. या अपघातात विमानातील २४१ जणांसह २६०  जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक व्यक्ती वाचला. विमानात १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, एक कॅनडाचा नागरिक तर ७ पोर्तुगाल नागरिक होते.

राज्य सरकारच्या अन्यायकारक कारवाढी विरोधात 'आहार' संघटनेची सोमवारी महाराष्ट्र बंद ची हाक..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

ठाणे : दोनच दिवसांपूर्वी देशभरातील १० केंद्रीय कामगार संघटनांनी 'भारत बंद' ची हाक दिली होती, आणि आता त्यानंतर येत्या १४ जुलैला म्हणजेच सोमवारी 'महाराष्ट्र बंद' ची हाक देण्यात आली आहे. हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशनने १४ जुलैला 'महाराष्ट्र बंद' ची हाक दिली आहे. राज्य सरकारच्या अन्यायकारक कर धोरणांविरूद्ध असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टरंट म्हणजेच 'आहार' संघटनेने हा एल्गार पुकारला आहे. त्यामुळे येत्या सोमवारी राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम आणि बार बंद राहणार आहेत.

यामुळे राज्याच्या महसुलावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 'आहार' संघटनेच्या वतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 'महाराष्ट्र बंद' बाबत पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र बंदचे कारण सांगितले आहे. १४ जुलै २०२५ रोजी राज्यव्यापी महाराष्ट्र बंद ! अन्याय्यकारक कराच्या बोज्याविरोधात महाराष्ट्रातील परमिट रूम आणि बार बंद राहणार आहेत. हॉस्पिटॅलिटी उद्योग आपला आवाज सर्वांसमोर मांडत आहे ! सोमवार, १४ जुलै २०२५ रोजी, महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार आमच्या उद्योगावर लादलेल्या अन्याय्य आणि प्रचंड कारवाढीच्या निषेधार्थ संपूर्ण बंद पाळतील. दारूवरील व्हॅट दुपटीने वाढ करण्यात आली. परवाना शुल्क १५ टक्के वाढवण्यात आले. उत्पादन शुल्कात ६० टक्केची मोठी वाढ करण्यात आली. राज्य सरकारच्या या तीव्र बदलांमुळे असंख्य लहान आणि मध्यम उद्योगांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ज्यामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या आणि उपजीविका धोक्यात आली आहे. 'हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया' कडून निष्पक्ष धोरणांची मागणी करण्यासाठी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही बंदची हाक देण्यात आली आहे. आम्ही सर्व उद्योग भागधारकांना एकत्र येऊन मजबूत राहण्याचे आवाहन करतो. चला आपण एक स्पष्ट संदेश देऊया आता पुरे झाले ! असेही या संघटनेने म्हटले आहे. 

राज्य सरकारच्या अन्यायकारक करवाढीच्या धोरणाविरोधात इंडियन हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन अर्थात 'आहार' संघटनेने १४ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगत संघटनेने आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान या आंदोलनांतर्गत राज्यभरातील २० हजार हून अधिक हॉटेल व रेस्टॉरंट मालकांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 'महाराष्ट्र बंद' चा सर्वाधिक प्रभाव मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर यांसह राज्यातील प्रमुख शहरी भागांमध्ये जाणवणार आहे. सोमवारी राज्यातील सर्व परमिट रूम्स, बार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. हा बंद पूर्णतः शांततेत पार पडणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, सरकारने जर याकडे दुर्लक्ष केले, तर पुढील काळात तीव्र आणि उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही संघटनेने दिला आहे.

उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ पोलीसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस मुद्देमालासह अटक करून दाखल गुन्हे केले उघड..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

उल्हासनगर - गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर यांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करून त्याच्या कडुन मुद्देमाल हस्तगत करून दाखल गुन्हे उघड केलेल्या उल्लेखनिय कामगिरी केली असून त्यांची प्रशंसा होतं आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात बदलापुर पोलीस ठाण्याचे हद्दीत दिनांक ०१/०७/२०२५ रोजी घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल होता. सदर गुह्याचा तपास गुन्हे शाखा घटक-४ कार्यालयाकडुन करण्यात येत असतांना पोहवा. गणेश गावडे यांना तांत्रिक तपासाच्या आधारे व त्यांचे गुप्त बातमीदाराकडून बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २५४/२०२५ बी.एन.एस. २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे रोशन बाळा जाधव हा बंद असलेल्या 'अमर डाय कंपनी' जवळ उल्हास नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उल्हासनगर-१ येथे फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने उल्हासनगर क्राईम ब्रांच युनिट-४ चे पोलीस अधिकारी व पथकाने कारवाई करून आरोपी रोशन बाळा जाधव (वय: ३४ वर्षे), राहणार हनुमान मंदिर जवळ, निळजेगाव, कल्याण फाटा, डोंबिवली पुर्व, जि. ठाणे यास ताब्यात घेतले व बदलापुर पो.स्टे. गुन्हा रजि.नं. २५४/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक केली. त्याचेकडून घरफोडी चोरीच्या गुन्ह्यामधील सोन्या, चांदीचे दागिणे, दोन लॅपटॉप, दोन मोबाईल, तसेच रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असुन खालील नमुद प्रमाणे घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

१) बदलापुर पश्चिम पो.स्टे.गु.र.नं. २५४/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे
२) बदलापूर पूर्व पो.स्टे.गु.र.नं. ३९१/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१ (३),३०५ प्रमाणे
३) बदलापूर पुर्व पो.स्टे.गु. रजि.नं.३५७/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ प्रमाणे 
४) बदलापूर पूर्व पो.स्टे.गु. रजि.नं.३७०/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ प्रमाणे
५) बदलापूर पूर्व पो.स्टे.गु. रजि.नं.२२९/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(४), ३०५, ६२, ३(५)प्रमाणे 
६) बदलापूर पुर्व पो.स्टे.गु.रजि.नं.३७१/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(१), ३०५ प्रमाणे
७) बदलापूर पुर्व पो.स्टे.गु.रजि. नं.३०७/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे
८) शिवाजीनगर पो.स्टे.गु.रजि.नं. ४७८/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम ३३१(३), ३०५(ए) प्रमाणे

तरी गुन्हे शाखा घटक-४ उल्हासनगर यांनी परिमंडळ-४, उल्हासनगर यांच्या हद्दीत वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी एकूण ०८ गुन्हे आरोपी रोशन बाळा जाधव यास अटक करून उघडकीस आणले आहेत. सदर गुन्ह्यामध्ये अटक आरोपीने चोरी केलेले १८९.१७ ग्रॅम वजनाचे १५,१३,३६०/- रू. किंमतीचे  सोन्याचे दागिने व १०,०००/- रू. किंमतीचे चांदीचे दागिणे, ८०,०००/- रू. किंमतीचे दोन लॅपटॉप, ५०,०००/-   
रू. किंमतीचे दोन मोबाईल फोन आणि गुन्हयात चोरीस गेलेल्या रक्कमेपैकी ३,२८,०००/- रू. रोख रक्कम असा एकुण १९,८१,३६०/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त, अमरसिंह जाधव, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, सपोनि. श्रीरंग गोसावी, पोहवा. गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, योगेश वाघ, चंद्रकांत सावंत, रितेश वंजारी, मंगेश जाधव, पोना. कुसूम शिंदे, विक्रम जाधव, पोशि. संजय शेरमाळे, अशोक थोरवे, प्रसाद तोंडलीकर, रेवणनाथ शेकडे, रामदास उगले नेमणूक गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर यांनी यशस्वीपणे केलेली आहे.

डोंबिवलीत प्रथमच संपन्न झाला महापालिका आयुक्तांचा जनता दरबार..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

कल्याण : महापालिका क्षेत्रातील नागरीकांच्या समस्यांचे जलद गतीने निराकरण व्हावे, या दृष्टीकोनातून दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी महापालिकेच्या मुख्यालयातील आयुक्त दालनात जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. आता डोंबिवलीतील नागरीकांना विशेषत: ज्येष्ठ नागरीकांना देखील जनता दरबारात समक्ष उपस्थित राहून आपल्या समस्या आयुक्तांसमोर मांडता याव्यात यासाठी प्रथमच आयुक्तांच्या जनता दरबाराचे आयोजन डोंबिवली (पूर्व) येथील पी.पी चेंबर्स येथे 'फ' प्रभाग कार्यालयाच्या इमारतीत काल दुपारी करण्यात आले होते. यावेळी सुमारे ७५ ते ८० नागरीकांनी जनता दरबारास उपस्थित राहून आपल्या समस्या आयुक्त व अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. सदर समस्यांवर चर्चा करुन त्यांचे त्वरीत निराकरण करण्याबाबतचे निर्देश आयुक्तांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
अनधिकृत बांधकामे होऊ नये यासाठी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना सक्त सुचना देण्यात आल्या असून असे बांधकाम होताना दिसले तर त्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण दिले आहेत, महापालिका रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्र यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असून केंद्र शासनाच्या “नॅशनल क्वालिटी अश्यूरन्स स्टँडर्ड” व “कायाकल्प” या प्रकल्पा अंतर्गत/सेवांतर्गत नागरी आरोग्य केंद्रे व महापालिका रुग्णालये यांच्या कार्यप्रणालीबाबत कालबध्द नियोजन करण्यात येत आहे आणि येत्या कालावधीत अधिक दर्जेदार सुविधा देण्याचा आपण प्रयत्न करु अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी योवळी पत्रकारांशी बोलताना दिली.

जनता दरबार संपन्न झाल्यानंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे तसेच इतर अधिकाऱ्यांसमवेत थेट चालत डोंबिवली स्थानक परिसराची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या.

मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली यांच्याकडुन परदेशी नागरीकास २.१२ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थासह अटक..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

डोंबिवली - मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली यांच्या गोपनीय बातमीदाराकडून त्यांना मिळालेल्या माहीतीनुसार दिनांक ०७/०७/२०२५ रोजी रात्री १०:५० वाजता निळजे गांव येथील तलावाजवळील सार्वजनिक रोडवर छापा टाकून सदर ठिकाणी मिळून आलेल्या आरोपीकडून एकुण १.५१ किलो मेफेड्रॉन (एमडी) ज्याची बाजारभाव किंमत अंदाजे २.१२ कोटी रकमेपेक्षा अधिक किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करून गु.र.नं ७८७/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मी कलम ८ (क), २१(क) २२(क) मध्ये त्यास अटक केलेली आहे. सदरचा आफ्रिकन देशातील परदेशीय नागरीक आरोपी नामे इसा बकायोका (वय: ३७ वर्षे) मुळ राहणार आयवोरी कोस्ट याच्याकडून एकूण १.५१ किलो मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
यापुर्वी दिनाक २७/०६/२०२५ रोजी गु.र.नं ७३१/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनीव्यावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २१(क) २२(क) अन्वये मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत सव्वा दोन कोटी रूपयांचे मेफेड्रॉन (एमडी) पकडण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने नवी मुंबई परिसरात आरोपीचा शोध येत असताना वरील माहीती मिळाल्याने यशस्वी कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच यापूर्वी दाखल केलेल्या गु.र.नं ७३१/२०२५ मधील मुख्य आरोपी फरहान उर्फ मोहम्मद राहीब सलीम शेख याच्या कडुन बँगलोर येथील चोरीची गाडी एम.डी सह ताब्यात घेण्यात आलेली आहे.

नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत काही गोपनीय माहीती असल्यास अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कल्याण तसेचं मानपाडा पोलीस ठाणे यांच्या दुरध्वनी कमांक (०२५१)२४७०१०४ यावर संपर्क साधावा. माहीती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

सदरची यशस्वी कामगिरी ही ठाणे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभागाचे श्री. संजय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ कल्याणचे श्री. अतुल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त डोबिवली विभागाचे श्री. सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीपान शिंदे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्री. दत्तात्रय गुंड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राम चोपडे, सपोनि सागर चव्हाण, अजय कुंभार, पोहवा. पाटील, माळी, राठोड, पोशी. आडे, गरुड, झांझुर्णे, चौधर यांच्या पथकाने केलेली आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये अवघे गर्जले पंढरपूर, विठू नामाच्या घोषाचे दुमदुमले सूर..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

डोंबिवली : 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे अहोभाग्यच म्हणावे लागेल की आज देवशयनी एकादशी, शुक्ल आषाढ यादिवशी विद्यार्थ्यांच्या रूपात साक्षात पांडुरंग रुक्मिणीच जणू काही 'जे एम एफ' मंडपम मध्ये अवतरले होते. मोठ्या संख्येने वारकरी होऊन आलेले जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळेचे आणि विद्यामंदिराचे विद्यार्थी संत मंडळीची मांदियाळीच जणू अवतरली होती.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे व इतर मान्यवरांनी विठल रखुमाई आणि पालखी मधील संत ज्ञानेश्वरांची विधीवत पूजा करून पालखी प्रस्थान सोहळा सुरू झाला. सर्वच मुलांनी विठूचा गजर करत, टाळ मृदूंगाचा घोष करत पालखी प्रस्थान सोहळ्यांमध्ये सामील झाले.  
इयत्ता तिसरी व पाचवी मधील विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी.. हा अभंग सादर केला. त्याच बरोबर शिशुविहार व पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य शिक्षिका दीपाली सोलकर व सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगण सोहळा संपन्न केला तर नाट्य विभागाचे शिक्षक श्री. प्रमोद पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली संत गोरा कुंभार नाटक छोट्या बाळ गोपाळ यांनी सादर केले. 
विठ्ठलाचे बाह्यरुपी वर्णन करताना संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितले की, विठ्ठल हा रंगाने सावळा आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, कानामध्ये मकर कुंडले आहेत असे  विठ्ठलाचे सात्विक रूप बघताना आपला अहंपणा अलगद निसटून जातो तर अंतर्रूप पाहताना निस्सिम त्यागाची भावना जाणवते, आणि आज असे हे सावळे, सुंदर, मनोहर  वाटणारे तुमचे रूप बघून साक्षात बालरूपातले विठ्ठल 'जे एम एफ' मंडप्पम मध्ये अवतरले आहेत असेच वाटत आहे. असे उद्गार काढून सर्वांना देवशयनी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
देवशयनी एकादशी म्हणजेच आजपासून पांडुरंग चार महिने निद्रावस्थेत जातात, त्यावेळी पुढचे आठ महिने इतर देवगण संसाराचा कारभार चालवतात, हेच एक उत्तम उदाहरण तुमच्या सर्वांसाठी आहे की आपण आपल्या शाळेचा, आपल्या वर्गाचा एक भाग आहोत, वर्गप्रतिनिधी उपस्थित नसला तरी ती तुम्हा सर्वाची जबाबदारी आहे की वर्गाला शिस्तबद्ध ठेवणे आणि सहकार्य करणे. आज ही संतांची मांदियाळी बघून खऱ्या अर्थाने पांडुरंग आपल्या भेटीसाठी आला आहे असे जाणवत आहे, असे उद्गार संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी काढले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. श्री.नरेश पिसाट, श्री.अवधूत देसाई, श्री.विठ्ठल कोल्हे यांनी हुबेहूब विट्ठल रुक्मिणी मंदिराची प्रतिकृती उभी केली, व समोरच तुळशी वृंदावन देखील तयार केले. 

"याची देही, याची डोळा पाहिला माऊलींचा रिंगण सोहळा.."


विठ्ठलाच्या नामघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात, फुगड्या खेळत माऊलींचा पालखी सोहळा संपन्न झाला. प्रसाद सेवन करून पुन्हा एकदा सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचा नामघोष करून सोहळ्याची सांगता झाली.

पुढील ५ वर्षांत कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अतिरिक्त ₹२५,००० कोटींची गुंतवणूक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पंढरपूर येथे महाराष्ट्र शासन व कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर यांच्यावतीने आयोजित ‘कृषी पंढरी’ या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांचा आणि शेतकरी बांधवांच्या मुक्कामाचे एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर. येथे शेतकरी बांधवांना एकाच ठिकाणी कृषी क्षेत्रात विकसित होत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान, संशोधन, नव्या शेती पद्धती तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित राज्य शासनाच्या सर्व योजनांची माहिती मिळावी, या उद्देशाने या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे. शेतीतील विविध यशस्वी प्रयोग, फलोत्पादन पद्धती, उत्पादन वाढविण्यासाठीचे संशोधन, माती परीक्षणापासून ते कापणीपर्यंतच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती या कृषी प्रदर्शनातून मिळते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. गावांमध्ये संपूर्ण कृषी व्यवस्थापन करून अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा देण्याचा प्रयत्न नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून होत आहे. दरवर्षी ₹५००० कोटीप्रमाणे, पुढील 5 वर्षांत ₹२५,००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक कृषी क्षेत्रात करण्यात येणार आहे. तसेच, शेतकरी बांधवांना दिवसा १२ तास वीज देण्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित वीजनिर्मितीचे काम सुरू झाले असून, या योजनेत सोलापूर जिल्हा अग्रेसर आहे. गावांतील बहुद्देशीय सोसायट्यांना १८ प्रकारचे व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. 

या प्रसंगी प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांचे अभिनंदन केले. यावेळी मंत्री ऍड. माणिकराव कोकाटे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.