BREAKING NEWS
latest

पंतप्रधान कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी आज नवीन पंतप्रधान कार्यालय सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन १ आणि २ चे उद्घाटन केले. आतापर्यंत पंतप्रधान कार्यालय साऊथ ब्लॉकमध्ये होते. सुमारे २.२६  लाख चौरस फूट (सुमारे ५ एकर) क्षेत्रात बांधले आहे. हे 'एल अँड टी कंपनी'ने ₹११८९ कोटी रुपयांमध्ये बांधले आहे. सेवा तीर्थ कॉम्प्लेक्समध्ये तीन इमारती आहेत: सेवा तीर्थ-१, सेवा तीर्थ-२ आणि सेवा तीर्थ-३. सेवा तीर्थ-१ मध्ये पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक इमारती ब्रिटिश राजवटीचे प्रतीक होत्या. गुलामगिरीच्या भारताच्या भूमीवर ब्रिटिश महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी या इमारती एक माध्यम म्हणून काम करत होत्या. आपल्याला गुलामगिरीच्या या मानसिकतेतून मुक्त होणे आवश्यक आहे.

पंतप्रधान म्हणाले, “दिल्लीच्या इमारती आणि ऐतिहासिक स्थळे गुलामगिरीच्या खुणांनी भरलेली आहेत. स्वतंत्र भारतात शहीद झालेल्या सैनिकांचे स्मारक नव्हते. २०१४ मध्ये, देशाने निर्णय घेतला की गुलामगिरीची मानसिकता आता सहन केली जाणार नाही. या निर्णयांमागे आमची सेवाभावी भावना आहे.”

सेवा तीर्थ संकुलात तीन इमारती आहेत: सेवा तीर्थ-१, सेवा तीर्थ-२ आणि सेवा तीर्थ-३. सेवा तीर्थ-१ मध्ये पंतप्रधान कार्यालय, सेवा तीर्थ-२ मध्ये कॅबिनेट सचिवालय आणि सेवा तीर्थ-३ मध्ये एनएससीएस आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे कार्यालय आहे. ही कार्यालये पूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी होती.

सप्टेंबर २०२५ मध्ये कॅबिनेट सचिवालय सेवा तीर्थ-२ मध्ये हलविण्यात आले. आज, पीएमओ सह, एनएससीएस आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे कार्यालय देखील तेथे हलविण्यात आले.

मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा तडकाफडकी बंद, पालक चिंतेत.

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : जोगेश्वरी पश्चिम परिसरात 'सिटी इंटरनॅशनल स्कूल' अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा प्रशासनाकडून शाळा बंद करण्यासाठी शाळेत शिकणाऱ्या ६०० विद्यार्थ्यांच्या पालकांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र, अचानक शाळा बंद करण्याच्या निर्णय घेतल्यामुळे शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांचे पालकांमध्ये मुलांच्या भविष्याच्या काळजीने भीतीच्या वातावरण पसरले आहे. तर, मनसे पक्षाने याची दखल घेत शाळेत धाव घेतली आहे.

मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाईंकडून शाळा बंद होऊ देणार नाही, असा म्हणत शाळा प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे. ओशिवरा परिसरातील ही शाळा, 'सिटी इंटरनॅशनल स्कूल' नावाने मागील २५ वर्षापासून सुरू आहे, येथील शाळेत ६०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळा भाडे तत्त्वावर असल्यामुळे जागा मालकाकडून महिन्याचे भाडे ३५ लाख रुपयांच्या जागेवर आता ५० लाख रुपये भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे, या भाडेवाढीला विरोध करत शाळा प्रशासनाने चक्क शाळाच बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण हा ३७ वर्षांनंतरचा दुर्मिळ योग आणि जागतिक उलथापालथीचे संकेत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण (सोलर एक्लिप्स) दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, दुपारी ०३.२६ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ७.५७ वाजता संपेल. ह्या ग्रहणाचा कुंभ राशी आणि धनिष्ठा नक्षत्रावर अधिक प्रभाव दिसेल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषीय अशा दोन्ही दृष्टीने अत्यंत विशेष ठरणार आहे.

या ग्रहणाचे वेगळेपण म्हणजे सुमारे ३७ वर्षांनंतर एक अत्यंत दुर्मिळ ग्रहस्थिती निर्माण होत आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी कुंभ राशीत राहु, बुध, शुक्र आणि चंद्रही राहतील. असा योग यापूर्वी ७ मार्च १९८९ रोजी झाला होता. हे एक कंकणाकृती सूर्यग्रहण आहे जिथे चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही, त्यामुळे सूर्याच्या सभोवताल एक “रिंग ऑफ फायर” किंवा तेजस्वी वलय दिसते. ग्रहण दक्षिणी आफ्रिका, अंटार्कटिका आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागात जिम्बाब्वे, जाम्बिया, तंजानिया, नामीबिया, मॉरिशस, बोत्सवाना, मोजाम्बिक, अर्जेंटिना आणि चिली या भागांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. सहसा ह्या ग्रहणानंतरचा प्रभाव हा जादा कालावधी करीता राहतो. ह्या ग्रहणाच्या पत्रिकेचा विचार केला असता संपूर्ण जगात/देशात मोठी अस्वस्थता पसरेल. संपूर्ण जगात मोठे बदल घडतील. नैसर्गिक आप्पतीत वाढ. मोठे भूकंप, वादळे, तुफान, वायू प्रदूषण, युद्धयजन्य परिस्थिती निर्माण होईल, किंवा युद्ध सुरू होईल. बॉर्डरवर कुरापती वाढतील. भयंकर घटना तसेच अत्याचार घडतील. दरड कोसळतील. उंचावरून पडण्याच्या घटना. शेजारील राष्ट्रे तसेच मित्र राष्ट्रे यांच्यासोबत संबंध बिघडतील.

हवाई अपघात, शांततेचा पुरस्कार करणाऱ्या देशावर संकटे, संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थेवर ताण, उत्पन्नात घट. सत्ताधारी पक्षाला प्रतिकूल, वृद्ध राजकीय नेत्यांना प्रतिकूल. राजकीय लोकांवर कारवाया, राजघराण्यातील तसेच मोठ्या पदावरील, अधिकारपदावर बसलेल्याना लोकांना प्रतिकूल, मंत्र्यांना प्रतिकूल. राजीनामे, पदावरून पायउतार व्हावे लागेल. मोठ्या लोकांवर तसेच काही धर्माशी संबंधित लोकांवर मोठे आरोप होतील. मोठी बंड, चकमकी, काही ठिकाणी सत्ता परिवर्तन. महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये येणाऱ्या काळात काही मोठ्या घडामोडी घडतील. प्रजा व प्रशासनाचे मतभेद हिंसक विरोधात बदलणार.

संपाचे प्रमाण वाढेल, शिक्षकांचे संप होण्याची शक्यता अधिक, सरकार, विरोधी पक्ष यांच्यातील मतभेद-विरोध वाढतच जाणार. बेकारीचे प्रमाण वाढणार. खून, दरोडे, माऱ्यामाऱ्या, मोठे हिंसाचार यात वाढ. मृत्युसंख्येत वाढ, म्युनिसिपालीटी प्रतिकूल, अग्निकांडाच्या घटनांमध्ये वाढ. रोग्याच्या साथी पसरतील, तापाची साथ पसरेल. सरकारचे दुर्लक्ष आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन भयंकर आपत्ती बनून लोकसंपत्तीला हानी पोहोचणार.

संसदेत अनपेक्षित परिस्थितीमुळे कामकाज अडचणीत येणार, अनुशासनहीनता किंवा अप्रिय वर्तनामुळे सदस्यांना राग येणार, ज्यामुळे सामान्य काम करणेही कठीण होणार. मंत्र्यांच्या बेसावधपणे केलेल्या किंवा वादग्रस्त वक्तव्यांमुळे संसदेत तणाव आणि विरोध वाढणार. संसद सदस्यांच्या अपघाताची शक्यता.

लेखक, साहित्यिक, पत्रकार, लहान मुले, सुप्रीम कोर्टातील वकील, न्यायाधीशांना प्रतिकूल, मृत्यूची शक्यता, बुद्धिवादी लोक, स्त्रिया, ग्रंथकार,  ग्रंथप्रकाशक, शैक्षणिक क्षेत्रातील लोक, बँकर यांना प्रतिकूल. स्पर्धा, संमेलने, कार्यक्रम यात खंड. सभा, संमेलने यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतील.

पायांची दुखणी बळावतील, वाढतील, या संबंधी त्रास वाढेल. हवामान बिघडेल, प्रदूषणात वाढ. नट, कलाकार, गायक, चित्रकार स्त्रिया, खास करून स्त्री कलाकारांना प्रतिकूल अपघात होण्याची शक्यता. श्रीमंत लोक मृत्यू पावतील. नर्तिका, गायिका, प्रसिद्ध महिला, फॅशन डिझायनर, रेडिओ, दूरदर्शन कलाकार यांना प्रतिकूल. हा काळ सामाजिक दृष्टिने पण चांगला नाही. देशामध्ये घटस्फोटांची संख्या वाढते. स्त्रियांवर अत्याचार झाल्यामुळे खळबळ उत्पन्न होणार. भगदड माजून मृत्यू, समुद्रात मोठी वादळे, समुद्रातील अपघातात वाढ, जहाज, बोटी बुडतील, जलसमाधी, जलमृत्यू तसेच धार्मिक चळवळीत वाढ. धार्मिक संस्था, ट्रस्ट किंवा यासंबंधी अनैतिक वर्तन, चुकीचे किंवा बेकायदेशीर कृत्य (भ्रष्टाचार, फसवणूक, अन्याय करणे, नियमांचे उल्लंघन) अश्या प्रकारची प्रकरणे समोर येतील
परदेशातील व्यापारात अडचणी, काही गूढ मृत्यू होतील.

उद्योगधंदे, रोजगार यांना प्रतिकूल, एखादा न आवडणारा कर वाढण्याची शक्यता. काही आंतरराष्ट्रीय करार बंद होतील, संकटात येतील. बँक आणि शेअर बाजाराला प्रतिकूल. शेअर मार्केटमध्ये मोठे चढ उतार. बाजरात मोठी अस्थिरता दिसेल, गुंतवणूकदारांचे अंदाज चुकतील चलनाचे अवमूल्यन, रुपयाची घसरण वाढणार. या ग्रहणामुळे तेलाचे भाव वाढतील. मूग, मसूर, कापूस, गूळ, गहू, साखर, सुती वस्त्रे, तूप यांच्यात ३-४ महिने तेजी.

लेखक
जितेश सावंत 
के. पी. विशारद, नक्षत्र सम्राट, वास्तू तज्ञ, शेअरबाजार, सायबरकायदा, तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदातज्ज्ञ आहेत.
ईमेल: <jiteshsawant33@gmail.com>

बँकांच्या वसुली एजंट्सना आर बी आय चा लगाम..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : आरबीआय ने कर्जवसुली प्रक्रियेत होणाऱ्या दादागिरीला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्जवसुलीबाबत नियमांचा मसुदा काल जाहीर करण्यात आला असून, हे नवे नियम १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहेत. यानुसार कर्जदारांना बँकेचे कर्ज थकल्यानंतर येणारे धमकीचे फोन आणि वसुली  एजंट्सचा त्रास कमी होणार आहे.

आरबीआय ने बँक आणि रिकव्हरी एजंट्सना वसुलीसाठी कोणत्याही प्रकारच्या कठोर किंवा अपमानास्पद पद्धत वापरण्याला मनाई केली आहे. यामध्ये, धमकीची किंवा अपमानास्पद भाषा वापरणे, मोबाईल किंवा सोशल मीडियावर अयोग्य संदेश पाठवणे, कर्जदाराच्या नातेवाईक, मित्र, सहकारी यांना त्रास देणे, सार्वजनिक ठिकाणी अपमान किंवा गोपनीयतेचा भंग करणे, थकबाकी किंवा कायदेशीर कारवाईबाबत दिशाभूल करणारी माहिती देणे अशा प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे.

नियमांनुसार, रिकव्हरी एजंटने ग्राहकांशी सभ्य आणि सन्मानपूर्वक संवाद साधणे बंधनकारक असेल. ग्राहकांसोबत झालेल्या सर्व दूरध्वनी संभाषणांचे रेकॉर्डिंग ठेवणे आवश्यक राहील. तसेच, सकाळी ८ ते सायंकाळी ७ या वेळेतच कर्जदाराशी संपर्क साधता येईल. वसुली एजंट फक्त कर्जदार किंवा हमीदाराशीच संवाद साधू शकतील. शोककाळ, लग्नसमारंभ किंवा सण-उत्सव अशा प्रसंगी संपर्क टाळणे बंधनकारक असेल. कर्जदाराने विशिष्ट वेळेत संपर्क न करण्याची विनंती केल्यास ती मान्य करावी लागेल.

नव्या मसुद्यानुसार, कर्जदाराची तक्रार प्रलंबित असताना बँकांना वसुलीची कारवाई करता येणार नाही. प्रथम तक्रार निकाली काढणे बंधनकारक असेल. तसेच, रिकव्हरी एजंटने कर्जदाराशी संपर्क साधण्यापूर्वी स्वतःचे नाव, संपर्क तपशील आणि तो कोणत्या बँकेच्या वतीने काम करत आहे, याची माहिती द्यावी लागेल.

केळी पीक विम्याचा २१७ कोटींचा घोटाळा उपग्रहाद्वारे आला समोर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
जळगाव : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शासकीय योजनांमध्ये पारदर्शकता येते हे बाब जळगाव येथे कृषी विभागाने केलेल्या कारवाईत पुन्हा सिद्ध झाली आहे. केळी पिकाच्या नावाखाली तब्बल २१७ कोटी रुपयांचा सरकारी निधी लाटण्याचा मोठा कट जळगावमध्ये उपग्रहाद्वारे केलेल्या सर्व्हे  तपासणीत उघड झाला आहे. लागवड नसतानाही कागदोपत्री केळीची बाग दाखवून पीक विम्याचे संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या हजारो बनावट अर्जांचा कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे.

पुनर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या ‘आंबिया बहर’ हंगामात यंदा जळगाव जिल्ह्यातून अर्जांची संख्या अनपेक्षितपणे वाढल्याचे दिसून आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २७ हजार २५९ अतिरिक्त अर्ज दाखल झाले होते, तर विमा संरक्षित क्षेत्रात २८ हजार १९६ हेक्टरची मोठी वाढ झाली होती. केळी लागवडीखालील क्षेत्रात झालेली ही वाढ संशयास्पद वाटल्याने कृषी आयुक्तालयाने उपग्रहाच्या साहाय्याने जमिनीची प्रत्यक्ष सर्व्हे पडताळणी करण्याचा निर्णय घेतला.

या अत्याधुनिक तपासणीत धक्कादायक वास्तव समोर आले. जिल्ह्यातील एकूण ९६ हजार १५२ हेक्टर विमा संरक्षित क्षेत्रापैकी प्रत्यक्षात केवळ ५२ हजार ११० हेक्टरवरच केळीची लागवड आढळली. उर्वरित ४४ हजार ४१ हेक्टर क्षेत्रावर केळीचे पीकच अस्तित्वात नसल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणात विमा हप्त्याच्या स्वरूपात जमा झालेले सुमारे ३७ कोटी ४३ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. वेळेत पडताळणी झाल्यामुळे राज्य सरकारचे १२३ कोटी ५३ लाख आणि केंद्र सरकारचे ९३ कोटी ५८ लाख, असे एकूण सुमारे २१७ कोटी रुपयांचे संभाव्य नुकसान टळल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. संबंधित बोगस अर्जदारांवर कठोर कारवाईचे संकेत कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास रस्तोगी यांनी दिले आहेत.

केडीएमसीत ५१ वारसांना नोकरीची संधी देत महापौरांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचे वाटप..

विशेष प्रतिनिधी

डोंबिवली, दि. १३ फेब्रुवारी – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त तसेच मयत सफाई कामगारांच्या ५१ वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नियुक्ती आदेशांचे वितरण आज महापौर दालनात करण्यात आले. महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले व आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते लाभार्थ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपआयुक्त वंदना गुळवे, महापालिका सचिव किशोर शेळके, सहा. आयुक्त सुषमा मांडगे, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे तसेच पालिका सदस्य वरुण पाटील, गणेश जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

नियुक्ती पत्र देताना महापौर हर्षाली चौधरी यांनी लाभार्थ्यांना शुभेच्छा देत जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने काम करण्याचे आवाहन केले. शहराच्या स्वच्छता व विकासासाठी नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा द्यावी, असे मार्गदर्शन आयुक्त अभिनव गोयल यांनी केले.

महापालिकेकडून गेल्या वर्षभरात एकूण २३२ वारसांना नियुक्ती पत्रे देण्यात आली असून, वारसा हक्कासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांसाठी दोन वेळा मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपआयुक्त वंदना गुळवे यांनी दिली.

ज्युपिटर हॉस्पिटल कडून डोंबिवलीत ५०० बेड्सचे बहुविशेषज्ञ रुग्णालय सज्ज..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि. १३ फेब्रुवारी : ज्युपिटर हॉस्पिटल तर्फे डोंबिवली येथे ५०० बेड्सचे अत्याधुनिक बहुविशेषज्ञ रुग्णालय रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी उद्घाटनासाठी सज्ज झाले असून, यामुळे मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मधील प्रगत आरोग्यसेवा सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण भर पडणार आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका (केडीएमसी), उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या परिसरांमध्ये दर्जेदार आरोग्यसेवेची दीर्घकाळापासून गरज भासू लागली होती. या भागातील रुग्णांना गंभीर उपचारांसाठी ठाणे किंवा मुंबई येथे जावे लागत असल्याची अडचण लक्षात घेऊन 'ज्युपिटर हॉस्पिटल'ने डोंबिवली येथे ५०० बेड्सचे सुसज्ज रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे रुग्णालय सर्वसमावेशक आरोग्यसेवा देणारे पूर्ण-सुविधायुक्त केंद्र असेल. नवजात शिशूंच्या जन्मापासून ते अवयव प्रत्यारोपण आणि कर्करोग उपचारांपर्यंत सर्व वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध असतील. समाजातील सर्व घटकांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्याचा यामागील उद्देश आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या रुग्णालयात आधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, अतिदक्षता विभाग (क्रिटिकल केअर) आणि प्रगत डायग्नॉस्टिक सुविधा उपलब्ध असतील. तसेच हे रुग्णालय  (आय जी बी सी) च्या सर्वोच्च पर्यावरणीय मानकांनुसार डिझाईन करण्यात आले आहे.

डॉ. अजय ठक्कर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, ज्युपिटर हॉस्पिटल, म्हणाले, “मोठ्या भारतीय शहरांमध्ये उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेसाठी कोणालाही ४५ मिनिटांपेक्षा अधिक प्रवास करावा लागू नये. आमची दृष्टी नेहमीच सर्वसमावेशक आणि उत्कृष्ट वैद्यकीय सेवा रुग्णांच्या जवळ उपलब्ध करून देण्याची राहिली आहे. डोंबिवलीतील ५०० बेड्सच्या रुग्णालयाचे उद्घाटन हे वाढत्या समुदायांसाठी प्रगत आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा विस्तारण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.”

डॉ. अंकित ठक्कर, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्युपिटर हॉस्पिटल, यांनी सांगितले,“भारतीय संस्कृतीत रुग्णाच्या कुटुंबाची भूमिका त्याच्या उपचार प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची असते, याची आम्हाला जाणीव आहे. आमची रुग्णालये केवळ रुग्णांच्या नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीय आणि काळजीवाहूंच्याही गरजा लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आली आहेत. रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचारांसोबतच उत्तम आरोग्यसेवेचा अनुभव मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”