BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये साकारला गेला 'प्रतिकृती काला घोडा' महोत्सव..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२० - कला आणि संस्कृतीचा संगम असणारे शहर म्हणजे मुंबई. सर्वात मानाचा समजला जाणारा आणि कलाकारांना वाव मिळवून देणारा 'काला घोडा' महोत्सवाचे आयोजन दर वर्षी मुंबई येथे होत असते. त्याचीच प्रतिकृती डोंबिवली शहरांमधील 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये दिनांक २० जानेवारी रोजी ब्रह्मा रंगतालय प्रांगणात 'काला घोडा महोत्सव' मोठ्या दिमाखदार रीतीने पार पडला.
 एक आठवडाभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असणारी 'जे एम एफ' संस्था म्हणजे उभरत्या कलाकारांना कलेचे दालन उघडून देणारे प्रवेशद्वारच होय. दिनांक १९ जानेवारी रोजी 'जे एम एफ' रोजगार मेळाव्याचे (जॉब मेळा) आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ३३ कंपन्या व ३५० च्या वर उमेदवार उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या संकल्पनेतून 'काला घोडा' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. सरस्वती, नटराज व गणेश पूजन करून व पाहुण्यांचे स्वागत करून संस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्या व कलाकार श्रीमती बॉस्की मॅडम यांनी आपल्या भाषणात सर्वांना शुभेच्छा दिल्या व सर्वांचे कौतुक केले.
'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मधील अनेक विध्यार्थ्यांनी आपल्या कल्पना शक्तीने अनेक प्रकारचे प्रकल्प   हस्तकलेने बनवून आणले होते तर हस्तकलेने रेखाटलेले चित्रफलक (कॅनव्हास पेंटिंग) हे काला घोडा महोत्सवाचे खास आकर्षण होते .  त्याच बरोबर हस्तकलेने तयार केलेला काला घोडा देखील संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ उभा करण्यात आला होता.संपूर्ण महोत्सव हा चल चित्राने साजरा होत होता. 'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळेमधील इयत्ता सहावीत शिकत असलेला विद्यार्थी  कु. अर्णव डोंगरे सुबक रित्या गणपती बाप्पाचे चित्र रेखाटत होता तर मूर्तिकार मग्न होऊन मूर्ती घडवण्याचे कार्य करत होते, हातावर मेहंदी काढणे, चित्र काढून त्यामध्ये रंग भरण्यात सगळे कलाकार मग्न झाले होते. प्रमुख पाहुण्या श्रीमती बॉस्की मॅडम यांनी देखील संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांचे चित्र रेखाटले .
कलात्मक शिक्षिका दीपा तांबे, सपना यन्नम, स्नेहा डोळे, अभिषेक देसाई, नरेश पिसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व मुलांनी काला घोडा महोत्सवासाठी अथक परिश्रम घेऊन नाविन्य पूर्वक प्रकल्प बनवले. संपूर्ण ब्रह्मा रंगतालय प्रांगण हे विविध कलात्मक साहित्याने भरून गेले होते. ब्रह्मा रंगतालयाच्या मंचावर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी आणि उभरते कलाकार गायक शिक्षक नितेश मेस्त्री यांनी नाट्यसंगीत सादर करून इयत्ता चौथी मधील व जाई या विद्यार्थिनीने नाट्य संगीतावर आपल्या कथक नृत्यातून गणेश वंदना सादर केली. कलात्मक शिक्षक अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिग्दर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नृत्य नाटक सादर केले. तसेच पदवी महाविद्यालय चे प्रोफेसर श्री.योगेश शिरसाट यांनी वासुदेवाचे रूप धारण करून "वासुदेव आला".. हे नृत्य सादर केले व उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता तिसरी चौथी मधील विद्यार्थ्यांनी गायन करून आपली कला सादर केली तर इयत्ता सातवी मधील कार्तिक या विद्यार्थ्याने उत्कृष्ट तबला वाजवून सर्व उपस्थितांना आनंद दिला. सौ.कविता गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिक्षिकानी काव्य वाचन सादर केले.
'जन गण मन' शाळा व्यतिरिक्त डोंबिवली मधील अनेक बाहेरच्या शाळांनी या महोत्सवाला हजेरी लावून आनंद घेतला. कला ही माणसाला जिवंत ठेवते तर कलाकार हा आपल्या कलेतून इतरांना जिवंत ठेवतो असे सांगत असतानाच, अंगी कला असणारा माणूसच केवळ जगण्याची कला साध्य करू शकतो, असे सांगत संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे पुढे म्हणाले की, कलाकार हा नेहमी पैशापेक्षा प्रेक्षकांच्या टाळ्यांचा भुकेलेला असतो, कोणत्याही कलाकाराला मनापासून दाद मिळाली की ती दाद त्याच्या मध्ये असलेल्या अंतर्गत भावने पर्यंत  पोहचते, आणि त्याची कला तप्त सोन्या प्रमाणे निखारते. खरोखरच अभिमान वाटतो की आज हे कलादालन केवळ एकाच कलेने भरलेले नाही तर यामध्ये असंख्य कलांचा संगम आहे. हस्तकला, चित्रकला, तैलचित्र, रांगोळ्या, मेहंदी सारख्या या कलांचा संगम म्हणजे कलाकारांना दिलेली मानवंदनाचं होय असेही उदगार संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी काढले व कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल सहभागी कलाकारांना पदक देऊन त्यांचा सन्मान केला.
'काला घोडा'  हे जरी महोत्सवाचे नाव असले तरी आमच्या शाळेतील मुलांची घौडदौड ही एखाद्या चेतक घोड्याप्रमाणेच आहे, आणि म्हणूनच नवनवीन प्रकल्प सादर करताना उत्साह आणि आनंद हा द्विगुणित होत असतो असे उद्गार संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी काढले. सर्व उपस्थितांनी रेलचेल असणाऱ्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. खजिनदार जान्हवी कोल्हे, संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका डॉ. प्रेरणा कोल्हे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी काला घोडा प्रदर्शनाला भेट देऊन मनोमन आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौं. श्रेया कुलकर्णी व प्रो.एकनाथ चौधरी यांनी केले तर वंदे मातरम् गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दिव्यातील पूर्वेकडील मध्य रेल्वेचे तिकीटघर मध्यरात्रीपर्यंत खुले ठेवावे अशी प्रवाशांची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवा : दिवा रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वेगाने वाढत असून दिवा शहराची ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकवस्ती पूर्वेला आहे. असे असूनही या स्थानकातील पूर्वेचे तिकीटघर रात्री नऊ वाजता बंद होत असल्याने त्यानंतर प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी पश्चिमेला जावे लागते.

मात्र पश्चिमेला असणारे तिकीटघर हे मुंबई दिशेकडे असल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागते. यामुळे रात्रीच्या वेळेस विशेषतः महिलांना त्रास होत असल्याने पूर्वेचे तिकीटघर मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवावे, अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ऍड. आदेश भगत यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

मार्चपासून पत्रीपुलाच्या तिसऱ्या पुलावरून होणार वाहतुकीचा सुखकर प्रवास..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : पत्रीपुलाच्या तिसऱ्या उड्डाणपुलावरून वाहतूक महिनाभर विलंबाने सुरू होणार असून जे काम फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु आता ते मार्चमध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) च्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. त्याच विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो पूल जानेवारी अखेर काम पूर्ण होऊन फेब्रुवारी महिन्यात खुला केला जाईल असे सांगितले होते. त्यानुसार पुलाच्या गर्डरचे काम पूर्ण झाले असून अन्य कामे सुरू आहेत, तांत्रिकदृष्ट्या ती कामे पुढे नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या पुलासाठी ३१ कोटींचा निधी मंजूर झाला होता, त्या पुलाचे ३६.६ आणि ४० मीटर अशा दोन भागात गर्डर टाकण्यात आले होते. पुलाची लांबी १०९ मीटर असून त्या पुलाची मागणी कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खा. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यानुसार तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एमएसआरडीसीने त्यास मंजुरी दिली. नव्या पुलामुळे वाहतूककोंडी कमी होणार असून समांतर रेल्वे उड्डाणपूल होणे आवश्यक होते. त्यानुसार आधीचा उड्डाणपूल तयार झाल्यावर तिसरा उड्डाणपूल होणे आवश्यक होते.

अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात वसलंय दिवा शहर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : दिवा विभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या व अस्तित्वात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप उद्धवसेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ऍड. रोहिदास मुंडे यांनी केला आहे.

निवडणूक काळात व त्या आधीही दिवा परिसरात अनेक अनधिकृत इमारती, मजले व बांधकामे उभी राहिली. यासंदर्भात अनेक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खान कंपाऊंड परिसरातील १५ अनधिकृत इमारती तोडण्यात आल्या.

दिवा विभागात कारवाई न होणे म्हणजे न्यायालयीन आदेशांचा आणि कायद्याचा अवमान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या संदर्भात पालिका आयुक्तांना निवेदन देत सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी केली आहे. ठोस कारवाई झाली नाही, तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशाराही मुंडे यांनी दिला आहे.

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर कल्याण मध्ये महापालिका निकालानंतर जीवघेणा हल्ला.

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण - कल्याण महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर एक धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण पूर्वेतील कैलासनगरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. अंबादास कांबळे असे हल्ला झालेल्या कार्यकर्त्याचे नाव असून जखमी अंबादास कांबळे यांना हल्ल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिंदे गटाचे कार्यकर्ते अंबादास कांबळे यांना जीवघेणी मारहाण झाली. किरण पावशे असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. किरण पावशे हा नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या एका अपक्ष उमेदवाराचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यानंतर परिसरात एकचं खळबळ उडाली आहे.

स्थानिक नागरिकांनी जखमी अंबादास कांबळे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे निवडणूक निकालानंतरही राजकीय वादाला हिंसक वळण लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.

जखमी अंबादास कांबळे यांनी आरोप करताना म्हटलं की 'किरणने जातीवरून शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. निवडणुकीत शिंदे गटाचं काम केल्याने मारहाण केली. त्याने लोखंडी फायटरने एकट्यानेच मारहाण केली.

भाविकांच्या सेवेत आजपासून मलंगगडावर देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर ट्रेन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.१८ : कल्याणमधील श्री मलंगगडावर आता भाविकांना मोठी सुविधा मिळणार आहे. देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर सेवा अखेर  सुरू झाली आहे. रविवारी भाजपा आमदार किसन कथोरे आणि सुलभा गायकवाड यांच्या हस्ते या सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. आजपासून सुरू झालेल्या या फ्युनिक्युलर सेवेमुळे भाविकांना मलंगगडावर जाणं अधिक सोपं, सुरक्षित आणि जलद होणार आहे. विशेष म्हणजे, सुप्रीम कंपनीकडून भाविकांसाठी दोन दिवस ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्री मलंगगड यात्रेच्या आधीच आता भाविकांच्या सेवेत फ्युनिक्युलर सेवा यंदा दाखल झाल्याने यंदाच्या यात्रेत भाविकांना मोठी सोय होणार आहे.

हा पथदर्शी प्रकल्पाचा प्रस्ताव २००४ मध्ये आमदार किसन कथोरे यांनी मांडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. मात्र मधल्या काळात याकडे दुर्लक्ष झालं होतं. त्यानंतर २०१२ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र, विधानसभा क्षेत्राचे विभाजन झाल्यानंतर हा प्रकल्प रखडला होता. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी या कामाला गती देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. यानंतर कामाला पुन्हा सुरुवात झाली आणि अखेर यंदा २०२६ मध्ये या फ्युनिक्युलर प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे.

मलंगगडावर, हाजी मंगलला कल्याण, मुंबई, नवी मुंबईतून अनेक भाविक येतात. जाण्यासाठी अंदाजे २६०० पायऱ्या चढून वर गडावर जावं लागतं. हा गड चढण्यासाठी जवळपास २तास लागतात. मात्र आता फ्युनिक्युलर ट्रेन आजपासून सुरू झाल्याने हे २ तासांचं अंतर अवघ्या १० मिनिटांत पूर्ण करून जाता येईल. या सुविधेच्या देखरेखीसाठी ७० जण असून १२० जण यातून प्रवास करू शकतात, अशी माहिती आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या सेवेला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई मंत्रालयातून फ्युनिक्युलर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. श्री मलंगगड यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू झाल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी मलंगगडावर जाण्यासाठी पायऱ्या चढून जावे लागत असे, ज्यामुळे अनेक भाविकांना त्रास होत असे. आता या फ्युनिक्युलर सेवेमुळे वृद्ध आणि लहान मुलांनाही सहजपणे गडावर जाता येणार आहे. या सेवेमुळे मलंगगडावरील पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

काय आहे फ्युनिक्युलर सेवा ?

फ्युनिक्युलर ही एक प्रकारची केबल रेल्वे प्रणाली आहे, ट्रॉली सारखी सुविधा आहे. गुरुत्वाकर्षण आणि केबल्सचा वापर करून मागे-पुढे अशा दोन गाड्या एका उंच उतारावर चालवल्या जातात. फ्युनिक्युलर हा शब्द लॅटिन भाषेतील असून लहान दोरी असा त्याचा अर्थ होतो. फ्युनिक्युलर सेवा लिफ्ट आणि ट्रेन अशा दोघांची मिळून तयार झालेली सेवा आहे.

या फ्युनिक्युलर सेवेसाठी पाठपुरावा करणारे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे लोकार्पणाच्या वेळी अनुपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या लोकार्पण सोहळ्याला शिंदे गटाचे खासदार आणि पदाधिकारी अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

'अनिल आय हॉस्पिटल'च्या ठाणे येथील सातव्या रुग्णालयाचे भव्य स्वरूपात उद्‌घाटन समारंभ संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे दि.१८ - ठाणे जिल्ह्यात गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह व दर्जेदार नेत्रसेवा देणाऱ्या 'अनिल आय हॉस्पिटलच्'या ठाणे शहरातील दुसऱ्या आणि एकूण सातव्या रुग्णालयाचे उद्घाटन आनंद भवन सोसायटी, भक्ती मंदिर रोड, तीन हात नाका, नेक्सा शोरूमच्या वर,  ठाणे येथे आज मोठ्या उत्साहात व सकारात्मक वातावरणात पार पडले. या अत्याधुनिक नेत्ररुग्णालयाच्या  उद्‌घाटन प्रसंगी कल्याण लोकसभेचे लाडके लोकप्रिय खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहून 'अनिल आय हॉस्पिटल'च्या सेवेचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा. श्री.निरंजन डावखरे यांनी देखील कार्यक्रमाला सदिच्छा भेट देत रुग्णालयाच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमात मा. श्री.नरेश म्हस्के यांनीही उपस्थित राहून 'अनिल आय हॉस्पिटल'च्या ठाणेकरांसाठी सुरू झालेल्या या नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटनप्रसंगी ठाणे शहरातील नगरसेवक, नामवंत डॉक्टर, रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य, तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रुग्णालयाची पाहणी करून उपलब्ध सुविधांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तसेच महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या, “ठाणेकरांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रेम, विश्वास आणि पाठबळामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. ठाणे शहरासाठी सर्वोत्तम, आधुनिक आणि रुग्णकेंद्रित नेत्रसेवा देण्याचा आमचा संकल्प पुढेही तितक्याच निष्ठेने सुरू राहील.”
ठाणे येथील हे नवीन रुग्णालय 'अनिल आय हॉस्पिटल'च्या सेवाविस्तारातील एक महत्त्वाचा टप्पा ठरत असून, ठाणेकरांसाठी नेत्रसेवेच्या दृष्टीने एक नवा विश्वास निर्माण करणारे केंद्र ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.