BREAKING NEWS
latest

देश-विदेश

featured/block-3

महाराष्ट्र

featured/block-3

ठाणे

featured/block-1

नवी मुंबई

featured/block-3

वसई विरार

featured/block-6

पालघर

featured/block-3

कल्याण-डोंबिवली

featured/block-2

उल्हासनगर-अम्बरनाथ-बदलापुर

featured/block-3

अन्य जिले

featured/block-4

Latest Articles

ठाकरेंची साथ सोडणाऱ्या महिला नेत्याच्या गळ्यातच महापौर पदाची माळ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई दि.२२ : मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाला आरक्षण जाहीर झालं आहे. यानंतर आता भाजपच्या काही महिला नगरसेवकांचं नाव महापौर पदाच्या शर्यतीत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. ठाकरे गटाला केवळ ६५ जागांवर यश मिळालं. तर भाजपला ८९ जागांवर यश मिळालं. भाजप हा मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर त्यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा मुंबईतील क्रमांक दोनचा पक्ष ठरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबईत २९  जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे मुंबई महायुतीला ११६  जागा मिळाल्या आहेत. मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमतसाठी ११४ जागांची आवश्यकता होती. पण महायुतीला त्यापेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या आहेत. पण तरीही महापौर पदाच्या सोडत पर्यंत भाजप आणि शिवसेनेला धाकधूक होती. कारण महापौर पदाची सोडत ही एसटी प्रवर्गासाठी असती तर सत्ताधारी पक्षांचे त्या प्रवर्गातील उमेदवार जिंकून आलेले नाहीत. केवळ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे एसटी प्रवर्गातील दोन उमेदवार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीमुळे राजकारणात मोठा ट्विस्ट येणार आणि ठाकरेंच्या शिलेदाराच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार का? अशी चर्चा रंगली होती.

यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या महिला नेत्याच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामागे कारणही अगदी तसंच आहे. खरंतर भाजपकडे तब्बल ४९ महिला नगरसेविका जिंकून आल्या आहेत. यापैकी अनेक महिला नगरसेवकांना अनेक वर्षांचा अनुभव आहे. तसेच महापौर पदाची सोडत ही सर्वसामान्य महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भाजपमधील राजश्री शिरवडकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, रितू तावडे, आशा मराठे, शितल गंभीर, योगिता सुनील कोळी यांची नावे महापौर पदाच्या शर्यतीत आहे. पण असं असलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेत एकेकाळी काम केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांचंदेखील नाव मुंबईच्या महापौर पदासाठी चर्चेत आहे.

तेजस्वी घोसाळकर यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या काही महिन्यांआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचे पती अभिषेक घोसाळकर शिवसेनेचे माजी नगरसेवक होते. पण त्यांचा फेब्रुवारी २०२४ मध्ये निर्घृण खून करण्यात आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तसेच तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी आमदार आहेत. स्वत: तेजस्वी घोसाळकर या दुसऱ्यांदा महापालिकेत निवडून गेल्या आहेत. तसेच पतीच्या निधननंतर मुंबै बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली होती.

तेजस्वी घोसाळकर हे ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून त्यांची मनधरणी करण्याचा पूरेपूर प्रयत्न करण्यात आला होता. पण काही दिवसांनी त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचं वृत्त समोर आलं होतं. तेजस्वी घोसाळकर या दहीसर येथील वॉर्ड क्रमांक २ येथून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत. त्यांचा आतापर्यंतचा राजकीय अनुभव पाहता भाजपकडून त्यांची मुंबई महापालिकेच्या महापौर पदी वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. असं असलं तरी भाजप धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहे. भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केला तर वेगळ्याच चर्चेत नसलेल्या चेहऱ्यालाही महापौर पदाची संधी मिळू शकते असे बोलले जात आहे.

दिव्यात आशेची किरणे उगवत ठाणे महापौरपदासाठी दिपक जाधव यांचे नाव आघाडीवर..

विशेष प्रतिनिधी

दिवा, दि.२२ जानेवारी – ठाणे महानगरपालिकेचे महापौर पद अनुसूचित जाती (एस सी) साठी आरक्षित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर दिवा प्रभाग समितीतील प्रभाग क्रमांक २८ मधील एस सी आरक्षित जागेतून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले नगरसेवक दिपक जाधव यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दिपक जाधव हे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांचे निकटवर्तीय मानले जातात. महापालिकेतील अनुभव, संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील सक्रिय कामकाजामुळे ते पक्षातील विश्वासू चेहरा म्हणून ओळखले जातात. दिवा–शीळ विभागातून शिवसेनेचे १० तर भाजपचा १ नगरसेवक निवडून आल्याने या विभागात शिवसेना भक्कम स्थितीत असल्याचे चित्र आहे. दिव्यातील २७,२८ आणि २९ हे प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जातात. 

दरम्यान, अनुभवी नगरसेवक दिपक जाधव यांची ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाल्यास दिवा परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांचा बॅकलॉग भरून निघेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व नागरी समस्यांवर प्रभावी निर्णय घेणारे नेतृत्व दिव्याला मिळावे, अशी दिव्यातील नागरिकांची इच्छा आहे.

महापौरपदाचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वाकडून होणार असला, तरी सध्याच्या घडीला दिपक जाधव यांचे नाव जोरदार चर्चेत असून, त्यांच्या संभाव्य निवडीकडे दिवा परिसराचे लक्ष लागले आहे.

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांच्याकडुन २ गावठी बनावटीचे पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : गोपनिय बातमीदारांकडुन प्राप्त माहितीच्या आधारे दिनांक १८/०१/२०२६ रोजी ०५.५६ वाजताच्या सुमारास साई पान शॉप समोर, फुटपाथवर, इंन्टरसिटी मॉलचे बाजुला, वागळे इस्टेट ठाणे (पश्चिम) येथे विधीसंघर्षित बालक नामे अबक राहणार: मु.खजुरिहा कला, तहसिल: रामनगर राजापुर, जिल्हा: चित्रकुट, रहेपुरा पोलीस ठाणा, राज्य: उत्तर प्रदेश हा दोन गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे असा एकुण २,१४,०००/- रु किंमतीचा माल अवैधरित्या विक्री करण्याच्या इराद्याने बेकायदेशीररित्या विनापरवाना हत्यारे कब्जात बाळगुन ठेवले असतांना सापडल्याने त्या  विधीसंघर्षित बालक नामे अबक याचेविरुध्द वागळे इस्टेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. २०/२०२६, भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. सुनिल तारमळे नेमणूक खंडणी विरोधी पथक, ठाणे हे  करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) ठाणे शहर, मा.श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) ठाणे, मा. श्री. विनय घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२. गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. शैलेश साळवी, सपोनि. सुनिल तारमळे, पोहवा. ठाकूर, शिंदे, जाधव, गायकवाड, पोशि. शेजवळ, मपोशि. भोसले यानी केली आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये साकारला गेला 'प्रतिकृती काला घोडा' महोत्सव..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२० - कला आणि संस्कृतीचा संगम असणारे शहर म्हणजे मुंबई. सर्वात मानाचा समजला जाणारा आणि कलाकारांना वाव मिळवून देणारा 'काला घोडा' महोत्सवाचे आयोजन दर वर्षी मुंबई येथे होत असते. त्याचीच प्रतिकृती डोंबिवली शहरांमधील 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये दिनांक २० जानेवारी रोजी ब्रह्मा रंगतालय प्रांगणात 'काला घोडा महोत्सव' मोठ्या दिमाखदार रीतीने पार पडला.
 एक आठवडाभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असणारी 'जे एम एफ' संस्था म्हणजे उभरत्या कलाकारांना कलेचे दालन उघडून देणारे प्रवेशद्वारच होय. दिनांक १९ जानेवारी रोजी 'जे एम एफ' रोजगार मेळाव्याचे (जॉब मेळा) आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ३३ कंपन्या व ३५० च्या वर उमेदवार उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या संकल्पनेतून 'काला घोडा' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. सरस्वती, नटराज व गणेश पूजन करून व पाहुण्यांचे स्वागत करून संस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्या व कलाकार श्रीमती बॉस्की मॅडम यांनी आपल्या भाषणात सर्वांना शुभेच्छा दिल्या व सर्वांचे कौतुक केले.
'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मधील अनेक विध्यार्थ्यांनी आपल्या कल्पना शक्तीने अनेक प्रकारचे प्रकल्प   हस्तकलेने बनवून आणले होते तर हस्तकलेने रेखाटलेले चित्रफलक (कॅनव्हास पेंटिंग) हे काला घोडा महोत्सवाचे खास आकर्षण होते .  त्याच बरोबर हस्तकलेने तयार केलेला काला घोडा देखील संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ उभा करण्यात आला होता.संपूर्ण महोत्सव हा चल चित्राने साजरा होत होता. 'जन गण मन' इंग्रजी माध्यमिक शाळेमधील इयत्ता सहावीत शिकत असलेला विद्यार्थी  कु. अर्णव डोंगरे सुबक रित्या गणपती बाप्पाचे चित्र रेखाटत होता तर मूर्तिकार मग्न होऊन मूर्ती घडवण्याचे कार्य करत होते, हातावर मेहंदी काढणे, चित्र काढून त्यामध्ये रंग भरण्यात सगळे कलाकार मग्न झाले होते. प्रमुख पाहुण्या श्रीमती बॉस्की मॅडम यांनी देखील संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांचे चित्र रेखाटले .
कलात्मक शिक्षिका दीपा तांबे, सपना यन्नम, स्नेहा डोळे, अभिषेक देसाई, नरेश पिसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व मुलांनी काला घोडा महोत्सवासाठी अथक परिश्रम घेऊन नाविन्य पूर्वक प्रकल्प बनवले. संपूर्ण ब्रह्मा रंगतालय प्रांगण हे विविध कलात्मक साहित्याने भरून गेले होते. ब्रह्मा रंगतालयाच्या मंचावर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी आणि उभरते कलाकार गायक शिक्षक नितेश मेस्त्री यांनी नाट्यसंगीत सादर करून इयत्ता चौथी मधील व जाई या विद्यार्थिनीने नाट्य संगीतावर आपल्या कथक नृत्यातून गणेश वंदना सादर केली. कलात्मक शिक्षक अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिग्दर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नृत्य नाटक सादर केले. तसेच पदवी महाविद्यालय चे प्रोफेसर श्री.योगेश शिरसाट यांनी वासुदेवाचे रूप धारण करून "वासुदेव आला".. हे नृत्य सादर केले व उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता तिसरी चौथी मधील विद्यार्थ्यांनी गायन करून आपली कला सादर केली तर इयत्ता सातवी मधील कार्तिक या विद्यार्थ्याने उत्कृष्ट तबला वाजवून सर्व उपस्थितांना आनंद दिला. सौ.कविता गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिक्षिकानी काव्य वाचन सादर केले.
'जन गण मन' शाळा व्यतिरिक्त डोंबिवली मधील अनेक बाहेरच्या शाळांनी या महोत्सवाला हजेरी लावून आनंद घेतला. कला ही माणसाला जिवंत ठेवते तर कलाकार हा आपल्या कलेतून इतरांना जिवंत ठेवतो असे सांगत असतानाच, अंगी कला असणारा माणूसच केवळ जगण्याची कला साध्य करू शकतो, असे सांगत संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे पुढे म्हणाले की, कलाकार हा नेहमी पैशापेक्षा प्रेक्षकांच्या टाळ्यांचा भुकेलेला असतो, कोणत्याही कलाकाराला मनापासून दाद मिळाली की ती दाद त्याच्या मध्ये असलेल्या अंतर्गत भावने पर्यंत  पोहचते, आणि त्याची कला तप्त सोन्या प्रमाणे निखारते. खरोखरच अभिमान वाटतो की आज हे कलादालन केवळ एकाच कलेने भरलेले नाही तर यामध्ये असंख्य कलांचा संगम आहे. हस्तकला, चित्रकला, तैलचित्र, रांगोळ्या, मेहंदी सारख्या या कलांचा संगम म्हणजे कलाकारांना दिलेली मानवंदनाचं होय असेही उदगार संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी काढले व कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल सहभागी कलाकारांना पदक देऊन त्यांचा सन्मान केला.
'काला घोडा'  हे जरी महोत्सवाचे नाव असले तरी आमच्या शाळेतील मुलांची घौडदौड ही एखाद्या चेतक घोड्याप्रमाणेच आहे, आणि म्हणूनच नवनवीन प्रकल्प सादर करताना उत्साह आणि आनंद हा द्विगुणित होत असतो असे उद्गार संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी काढले. सर्व उपस्थितांनी रेलचेल असणाऱ्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. खजिनदार जान्हवी कोल्हे, संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका डॉ. प्रेरणा कोल्हे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी काला घोडा प्रदर्शनाला भेट देऊन मनोमन आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौं. श्रेया कुलकर्णी व प्रो.एकनाथ चौधरी यांनी केले तर वंदे मातरम् गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दिव्यातील पूर्वेकडील मध्य रेल्वेचे तिकीटघर मध्यरात्रीपर्यंत खुले ठेवावे अशी प्रवाशांची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवा : दिवा रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वेगाने वाढत असून दिवा शहराची ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकवस्ती पूर्वेला आहे. असे असूनही या स्थानकातील पूर्वेचे तिकीटघर रात्री नऊ वाजता बंद होत असल्याने त्यानंतर प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी पश्चिमेला जावे लागते.

मात्र पश्चिमेला असणारे तिकीटघर हे मुंबई दिशेकडे असल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागते. यामुळे रात्रीच्या वेळेस विशेषतः महिलांना त्रास होत असल्याने पूर्वेचे तिकीटघर मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवावे, अशी मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ऍड. आदेश भगत यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

मार्चपासून पत्रीपुलाच्या तिसऱ्या पुलावरून होणार वाहतुकीचा सुखकर प्रवास..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : पत्रीपुलाच्या तिसऱ्या उड्डाणपुलावरून वाहतूक महिनाभर विलंबाने सुरू होणार असून जे काम फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु आता ते मार्चमध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) च्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. त्याच विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो पूल जानेवारी अखेर काम पूर्ण होऊन फेब्रुवारी महिन्यात खुला केला जाईल असे सांगितले होते. त्यानुसार पुलाच्या गर्डरचे काम पूर्ण झाले असून अन्य कामे सुरू आहेत, तांत्रिकदृष्ट्या ती कामे पुढे नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

या पुलासाठी ३१ कोटींचा निधी मंजूर झाला होता, त्या पुलाचे ३६.६ आणि ४० मीटर अशा दोन भागात गर्डर टाकण्यात आले होते. पुलाची लांबी १०९ मीटर असून त्या पुलाची मागणी कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खा. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यानुसार तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एमएसआरडीसीने त्यास मंजुरी दिली. नव्या पुलामुळे वाहतूककोंडी कमी होणार असून समांतर रेल्वे उड्डाणपूल होणे आवश्यक होते. त्यानुसार आधीचा उड्डाणपूल तयार झाल्यावर तिसरा उड्डाणपूल होणे आवश्यक होते.

अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात वसलंय दिवा शहर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : दिवा विभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या व अस्तित्वात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप उद्धवसेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ऍड. रोहिदास मुंडे यांनी केला आहे.

निवडणूक काळात व त्या आधीही दिवा परिसरात अनेक अनधिकृत इमारती, मजले व बांधकामे उभी राहिली. यासंदर्भात अनेक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खान कंपाऊंड परिसरातील १५ अनधिकृत इमारती तोडण्यात आल्या.

दिवा विभागात कारवाई न होणे म्हणजे न्यायालयीन आदेशांचा आणि कायद्याचा अवमान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या संदर्भात पालिका आयुक्तांना निवेदन देत सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी केली आहे. ठोस कारवाई झाली नाही, तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशाराही मुंडे यांनी दिला आहे.